। चिपळूण । वृत्तसंस्था ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूणजवळील परशुराम घाटात काम सुरू असताना दरड कोसळली. या दरडीच्या ढिगाऱ्यात जेसीबी अडकला आहे. तर, दोन कामगार ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली.
या दरडीत अडकलेल्याना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळताना एका कामगारानं पळत स्वतःचा जीव जीव वाचवला. परंतु, दोन कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीसुद्धा अजूनही दरडीचा आणखी काही भाग कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक दोन्ही बाजूने थांबवण्यात आली आहे. दोन ते अडीच तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे घाटामध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून कळंबस्ते-चेरणी मार्गे लोटे, अशी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.