धक्कादायक! वायरमनच निघाला विज चोर

Electric power lines over sunrise

कुर्डूस गावठाण येथील धक्कादायक प्रकार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

विज चोरी विरोधात महावितरण कंपनी मोठया प्रमाणावर मोहिम राबवित आहे. यासाठी सर्व कर्मचारी अधिकारी धडक कारवाया करत असतात. मात्र अलिबाग तालुक्यातील कुर्डूस गावठाण येथे वायरमन असलेल्या नामदेव ठोंबरे याने स्वतःच आपल्या घरासाठी घेतलेल्या विज जोडणीसाठी विज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नामेदव ठोंबरे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबतचे वृत्त असे की, कुर्डूस गावठाण येथे कनिष्ठ अभियंता ओमप्रकाश सावळे, प्रधान तंत्रज्ञ चंद्रकांत फसाळे, वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन म्हात्रे हे गेले होते. यावेळी त्यांना विज ग्राहक असणार्‍या वायरमन नामदेव ठोंबरे याचे विज देयक चेक केले असता 20 ते 30 युनीटचाच वापर होत असल्याचे निदर्शनास आले. सदर विज वापर इतका कमी का होतो हे पाहण्यासाठी सर्व्हीस वायरचे निरीक्षण केले. त्यावेळी सदर वायरमनच्या घरामागे असलेल्या सर्व्हीस वायर चेक करताना असे निदर्शनास आले की घराला दोन सर्व्हिस वायरवरुन विज पुरवठा केला जात होता. त्यावर सर्व्हिस वायरच्या दिशेने विज पोलाजवळ पोहचल्यावर तेथे मीटरला विज पुरवठा होत असलेल्या सर्व्हिस वायरच्या व्यतिरिक्त अजून एक सर्व्हिस वायर थेट विद्युत लाईनला जोडून घरामध्ये विज पुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर लगेच वायरमन नामदेव ठोंबरे याला त्याच्या घरी बोलावून घेतले. त्यांच्यासमक्ष त्यांना सदरील सर्व्हिस वायर थेट लाईनवर टाकून विजचोरी केल्याचे निदर्शनास आणून दिले. व त्यानंतर त्यांनी मीटरच्या बोर्डावर लावलेल्या प्लग पिनबद्दल विचारले असता त्यांनी सहजच लावली असल्याचे उत्तर दिले. त्यावर वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन म्हात्रे यांना मीटर बोर्ड खोलण्यास सांगितले. मीटर बोर्ड खोलल्यानंतर असे लक्षात आले की मीटर ला येणारी सर्व्हिस वायर टॅप करुन त्या प्लगपिनला सप्लाय देऊन विजचोरी केली जात आहे. त्यानुसार कारवाई करीत सर्व्हिस वायर, फ्लेस्किबल वायर, मेन स्विच, फ्युज पिन प्लग जप्त करुन ठोंबरे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Exit mobile version