| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई पोलीस दलात कार्यरत महिला कॉन्स्टेबल एका ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. ऑपरेशनसाठी त्यांना भुलीचे इंजेक्शन देण्यात आले, मात्र त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरातील लोखंडवाला परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील यांना कानाचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी त्यांना कानाचे एक ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल झाल्या. ठरल्याप्रमाणे त्यांना ऑपरेशनसाठी ओटीमध्ये नेण्यात आले. त्यानंतर ऑपरेशनसाठी त्यांना भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर कॉन्स्टेबल गौरी पाटील यांची प्रकृती खालवली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
कॉन्स्टेबल गौरी पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. मरोळ पोलीस कॅम्पात कार्यरत महिला पोलीस कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील कानाच्या ऑपरेशन करता लोखंडवाला परिसरात ॲक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. मात्र, कानाच्या ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांकडून चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे महिला पोलीस शिपायाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पोलिसांच्या आरोपावर हॉस्पिटल बोलण्यास नाकार देत आहे. आंबोली पोलिसांनी एडीआर दाखल करून अधिक तपास करीत आहे.