| पोलादपूर । वार्ताहर ।
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील लोहारे गावातील एका तरूणाचा सावित्री नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या तरूणाच्या अकाली मृत्यूने लोहारे पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
नदीपात्रामध्ये होडीनाका पिंपळाचा डोह येथे नेहमीप्रमाणे रेडयाला पाणी पाजण्यासाठी गेलेला 22 वर्षीय तरूण यश सुरेश थिटे याच्या हातात रेडयाची रस्सी होती. रेडा पुढे गेल्यानंतर रस्सीमुळे खोल पाण्यात ओढला जाऊन सावित्री नदीच्या पात्रामध्ये यश बुडाला. या घटनेनंतर नरवीर मदत टीमचे दीपक उतेकर आणि अन्य स्थानिक तरूणांनी यशला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, तत्पूर्वीच यश याचा मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्याने त्यास ग्रामस्थांच्या मदतीने रूग्णवाहिकेतून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये आणले.
यावेळी माजी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे तसेच अन्य सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी यश याच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यानंतर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी पोलीस उपनिरिक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरीय तपासणी व पंचनामा करून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात यश याचे पार्थिव देण्यात आले.