प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार

| सांगली | प्रतिनिधी |

सांगली लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार, माजी आ. प्रकाश शेंडगे यांच्या मोटारीला अज्ञातांनी चपलांचा हार घालून काळे फासले. तसेच ‘निवडणुकीतून माघार आणि मराठा समाजाच्या नादी लागू नका’ असा धमकीचा मजकूर असलेले पत्र चिटकवण्यात आले आहे. सांगलीतील सर्व्हीस रस्त्यावरील ग्रेट मराठा समोर हा प्रकार घडला आहे. माजी आमदार शेंडगे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात ओबीसी बहुजन पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा मतदारसंघात प्रचारही सुरू आहे.

सांगलीत मुक्कामास असताना ते ग्रेट मराठा हॉटेलमध्ये उतरले होते. त्यांची मोटार हॉटेलसमोर पार्किंगमध्ये लावली होती. पहाटेच्या सुमारास कोणीतरी त्यांच्या मोटारीला चपलांचा हार घातला. तसेच मोटारीवर काळा रंग फासला. तसेच धमकीचा मजकूर असलेले पत्र चिटकवण्यात आले आहे. या पत्रात ‘निवडणुकीतून माघार घ्यावी, नाशिकमध्ये जशी माघार घेतली तशी सांगलीतून माघार घ्यावी. मराठा समाजाच्या नादी लागू नका’ असा मजकूर लिहिलेला आहे. रविवारी सकाळी शेंडगे यांचा चालक मोटारीजवळ आल्यानंतर त्याला हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्याने शेंडगे यांना सांगितले. त्यानंतर कार्यकर्तेही मोटारीजवळ जमले. त्यांनी यळकोट… यळकोट… जय मल्हार अशी घोषणाबाजी केली.

Exit mobile version