दुकान फोडणारे पोलिसांच्या ताब्यात

खोपोली पोलिसांची कारवाई; तीन लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त

| अलिबाग | प्रमोद जाधव |

खालापूर तालुक्यातील ताकई फाटा येथील दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून तीन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई खोपोली पोलिसांकडून करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली परिसरातील शिळगाव येथील रहिवासी रामचंद्र रासकर यांच्या मालकीचे ताकई फाटा येथे दुकान आहे. गुरुवारी (दि. 03) रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी खिडकीतून घुसून घरफोडी केली. दुकानात असलेल्या पॉलिकॅब कंपनीच्या तीन लाख 20 हजार रुपये किंमतीच्या केबलसह अन्य ऐवज चोरण्यात आला होता. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीच्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे, पोलीस हवालदार अमित सावंत, पोलीस हवालदार संदीप चव्हाण, पोलीस हवालदार निलेश कांबळे, पोलीस नाईक लिंबाजी शेडगे, पोलीस शिपाई समीर पवार, पोलीस शिपाई रामा मासाळ, पोलीस शिपाई किरण देवकाते, पोलीस शिपाई प्रणित कळमकर, पोलीस शिपाई आकाश डोंगरे यांचे पथक तयार करण्यात आले.

या पथकामार्फत तपासाची सूत्रे हाती घेण्यात आली. परिसरातील वीस ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये गुन्ह्यात वापरलेले वाहन निष्पन्न झाले. त्यानंतर दुचाकीच्या मालकाची माहिती घेण्यात आली. मोबाईल क्रमाकांच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला. अखेर उत्तर प्रदेश येथील मुळ रहिवासी असणारा झुबेर शेख (34) याला अटक करण्यात आली. त्यानंतर अन्य साथीदारांचा शोध घेण्यात आला. त्यांना पुणे, नाशिक, व गुजरातमधून उचलण्यात आले. गुजरातमधील अंकलेश्वर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या मदतीने तिघांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडीदेखील जप्त करण्यात आली. यातील आणखी एक आरोपी मुंब्रा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला कल्याण शिळफाटा येथून ताब्यात घेतले. जुबेर शेखसह आलम मनियार, दिपक तिवारी, रामविलास यादवर, जुबेर मेमन, सिराउजद्दीन खान या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चारजण मुळचे उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. यातील तिघेजण सध्या पुणे येथे राहत होते. एकजण पुणे जिल्ह्यातील कुदळवाडी येथील असून आणखी एकजण ठाणे जिल्ह्यातील खडीगांवमधील आहे.

अनेक दिवस दुकानावर लक्ष होते
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जुबेर शेख याला सुरुवातीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर अन्य आरोपींना ताब्यात घेतले. जुबेर शेख हा मुळचा उत्तरप्रदेश राज्यातील घौसी येथील रहिवासी आहे. तो गेल्या अनेक वर्षापासून खालापूर तालुक्यातील लौजी येथे राहत होता. मोलमजूरीसह काही कामे तो या परिसरात करीत होता. ताकई फाटा येथील दुकानावर त्याचे अनेक दिवसांपासून लक्ष होते. त्यानंतर मित्रांच्या मदतीने त्याने दुकान फोडले.
सहाजण सराईत गुन्हेगार
ताकई फाटा येथे दुकानात घुसून केलेल्या चोरी प्रकरणातील सहा आरोपिंना पकण्यास खोपोली पोलिसांना यश आले. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरोदात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, अशा अनेक प्रकारचे गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल असल्याची माहिती खोपोली पोलिसांनी दिली.
गुन्हयात वापरलेली रिक्षा चोरीची
ताकई फाटा येथे झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात पिकअप गाडी, ऑटो रिक्षा अशी अनेक वाहने वापरण्यात आली आहे. ही वाहने पोलिसांनी जप्त केली असून त्यांची किंमत चार लाख 90 हजार रुपये इतकी आहे. चोरट्यांनी लंपास केलेला ऐवज नेण्यासाठी रिक्षाचा वापर केला होता. ही रिक्षा चोरीची असल्याचे उघड झाले आहे. मिराभाईंदर येथील ही रिक्षा असल्याची माहिती समोर आली आहे. याची नोंद कासेगाव पोलीस ठाण्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.
Exit mobile version