71 लाखांपेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त
। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीतील श्री तेज फार्महाऊसवर शुक्रवारी (दि.4) फायटर कोंबड्यांवर सट्टा लावण्याचा प्रकार समोर आला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच खालापुर डीवायएसपी संजय शुक्ला यांनी फार्महाऊसवर कारवाई करीत 32 जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच जवळपास 40 कोंबड्यांनाही ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शनिवारी (दि.5) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संजय शुक्ला यांच्यासह खोपोली पोलिस निरीक्षक शिरीष पवार, खालापूर पोलीस निरीक्षक बाळा कुंभार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ही कारवाई रात्री 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरु होती. या कारवाईत रोख रक्कमेसह काही वाहने असे मिळून एकूण 71 लाख 78 हजार 195 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोंबड्यांच्या झुंज लावून सट्टा खेळण्याचा पहिल्यांदाच प्रकार रायगड जिल्ह्यात घडला असल्याचे बोलले जात असल्याने सट्टा बाजारत व नागरिकांमध्ये ह्या प्रकारची मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे.