दि.बा. पाटील विद्यालयात शॉर्टसर्किट

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल येथील लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयात रात्री साडेदहाच्या सुमारास मुख्य वीजपुरवठा पॅनलमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याची घटना घडली. मात्र, सुरक्षा रक्षक, शाळेतील कर्मचारी, महापालिका कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

मुख्य वीजपॅनलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ इतर कर्मचाऱ्यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी व इलेक्ट्रीशियन घटनास्थळी दाखल झाले आणि मुख्य वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. त्यामुळे शॉर्टसर्किटमुळे आग पसरण्याचा तसेच पुढील धोका निर्माण होण्याची शक्यता टळली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशामक दलही तातडीने घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाच्या जवानांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही. सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Exit mobile version