मुरूडमध्ये मासळीचा तुटवडा; खवय्यांची मोठी निराशा

मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
होळीसाठी मुरूड परिसरात मोठया संख्येने चाकरमानी आणि पर्यटक आले असून, रविवारी सकाळी खवय्ये आणि पर्यटकांची मासळी खरेदीसाठी मुरूड मार्केटमध्ये मोठी गर्दी उसळली होती. मात्र, मोठी मासळी न आल्याने आणि उपलब्ध मासळीचे दर गगनाला भिडल्याने स्थानिक खवय्ये आणि पर्यटकांना अखेर मासळी खरेदी न करताच परतावे लागत असल्याचे दिसत होते. समुद्र उशाशी असूनही मुरूडमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून मासळीचा तुटवडा असून, रविवारीदेखील तेच चित्र दिसत होते.
मागील दोन महिन्यांपासून समुद्रात मासळी मिळत नसल्याने येथील मच्छिमार पुढील वेळी मासळी मिळेल या अपेक्षेने डिझेल खर्च करून मासेमारीस जाताना दिसून येत आहेत. रविवारी मार्केटमध्ये कोलंबी, बांगडे, मांदेली आणि काटेरी मासळी विक्रीस आलेली दिसत होती. मुरूड मार्केट मधील मासळी विक्रेत्या वर्षा मकू, रोहिणी मकू यांनी सांगितले की, समुद्रात नौका जाऊनही मासळी मिळत नाही. डिझेलचा खर्चदेखील सुटत नाही. आमच्या या परिस्थितीकडे कोणीही लक्ष देत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मच्छिची आवक कमी असल्याने खवय्यांनी चिकन व मटणावर ताव मारल्याने विक्रेत्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. परंतु, आवक कमी असलेली मच्छीची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून आले. पापलेट जोडी रु700 कोलंबी वाटा रु 100 , मांदेली वाटा रु 50 , पाला मासळी रु 500, बांगडा छोटा वाटा रु 60, रावस एक तुकडा पीस-रु 250, सुरमई- पीस रु 150 अशा प्रकारे मासळी उपलब्ध होती. मुबलक अशी कोणतीही मासळी दिसून आली नाही.

Exit mobile version