| कोलाड | प्रतिनिधी |
सद्या बाजारपेठेत एक, दोन, पाच रुपयांच्या नाण्यांसह दहा, वीस व पन्नास रुपयांच्या नोटांची चणचण जाणवत आहे. त्यामुळे किरकोळ खरेदी, भाजी बाजार, किराणा दुकाने, बस व रिक्षा भाड्यांसह इतर छोटे मोठे दैनंदिन व्यवहारात ग्राहक व व्यापारी दोघांनाही मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सध्या ऑनलाईन आर्थिक व्यवहाराचे प्रमाण वाढले असले, तरी ग्रामीण भागात रोख व्यवहार करतांना सुट्ट्यां पैशांची मोठी अडचण निर्माण होत आहे. रोजच्या व्यवहारात एटीएममधून पैसे काढतांना फक्त 100, 200, 500 रुपयांच्या नोटा येत असल्यामुळे पैसे सुट्टे करणे कठीण होत आहे. त्यातच 10 व 20 रुपयांच्या नोटा अनेकदा फाटक्या, तुटक्या, चिटकवलेल्या अथवा जीर्ण अवस्थेत असतात. अशा नोटा काही दिवसांनी वापरण्या योग्य राहत नाहीत. त्यामुळे व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असून, अशा नोटा सांभालणे अवघड झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर सुट्टे पैसे व्यवहारात उपलब्ध व्हावेत, अशी मागणी व्यापारीवर्ग व ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बाजारात सुट्ट्या पैशांची चणचण
