| चिरनेर | प्रतिनिधी |
तालुक्यासाठी एकमेव असलेल्या उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात श्वान दंशानंतर लागणारे अँटी रेबीज आणि अतिशय महत्त्वाचे असलेल्या व धनुर्वाद प्रतिबंध टीटीच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या अत्यावश्यक औषधांसाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्याचबरोबर काही काळ औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या जीवतास धोका निर्माण होत आहे. वाढत्या आजारांमुळे व न परवडणाऱ्या खासगी रुग्णालयातील उपचार सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे असल्यामुळे, उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे. विविध आजरांवर उपचार घेण्यासाठी दररोज 300 हून अधिक रुग्ण येत आहेत.
ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र शासनाने उरण तालुक्यातील नागरिकांसाठी 1989 च्या लोकसंख्येवर आधारित हे रुग्णालय उभारले असून, या रुग्णालयात 35 वर्षापूर्वीची कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी संख्या आहे. 2010 पासून मुलांचे नागरिकांना प्रस्तावित 100 घाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षा आहे.
उरण औद्योगिक व नागरिकांच्या दृष्टीने वाढते शहर आहे. येथील औद्योगिक परिसर आणि मुंबई, नवी मुंबई या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या दळण वळणामुळे लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. 35 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या 30 खाटांचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय व कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन ठिकाणी वैद्यकीय सुविधा पुरवणारी यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील नागरिकांना शेजारच्या पनवेल तालुक्यातील किंवा मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात अनेक असुविधा आहेत. त्यासाठी खासगी व्यावसायिक यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. तालुक्यात सुसज्ज असे शासकीय रुग्णालय उभारावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. त्यासाठी आंदोलनही उभारले गेले आहे. त्यानंतर 2010 मध्ये शासनाने 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजूरी दिली आहे. मात्र रुग्णालयाच्या नवीन आराखड्याच्या प्रतीक्षेत नागरिक असून, या मंजूर रुग्णालयाचीही गेल्या पंधरा वर्षापासून प्रतीक्षा आहे.
ग्रामीण रुग्णालयात दिवसाला दहा ते पंधरा श्वान दंशाचे रुग्ण येतात. मात्र औषधांचा साठा पुरेसा नसल्याने रुग्णांना जिल्हा रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. गेल्या काही दिवसात उरणमधील शन दंशाची संख्या वाढली आहे.
-डॉ.बाबासाहेब काळेल
अधीक्षक इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय
