विधानसभेत शेकापची ताकद दाखवा

प्रीतम म्हात्रे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल-उरण तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची ताकद मोठी आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात काही कारणाने पक्षाची ताकद क्षीण झाली होती. परंतु, शेकापचा कार्यकर्ता लढावू आणि निष्ठावान आहे. या कार्यकर्त्यांनी आता एकजूट दाखवून विधानसभेत पक्षाचा लाल बावटा फडकवावा, असे आवाहन प्रीतम म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाताण येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

उरण मतदार संघाचे शेकाप उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी विधानसभा निवडणूक निमित्ताने पनवेल तालुक्यातील कष्टकरीनगर, पोसरी, नारपोली, गिरवले, सावला, देवलोली, कसलखंड व भाताण या गावांतून निवडणूक प्रचार दौर्‍याचे आयोजन केले होते. यावेळी निवडणूक दौर्‍यादरम्यान गावागावात त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रीतम म्हात्रे म्हणाले की, आज युवकांना रोजगाराची समस्या भेडसावत आहे. ती सोडवून तालुक्यात विकास घडवून आणायचा असून त्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत. यासाठी तुम्हा सर्वांची मला साथ हवी आहे आणि मला ती मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना म्हणाले की, पनवेल तालुक्यातील पोसरी, मिरवले, नारपोली व सावला या भागात आ. विवेक पाटील यांनी भरीव विकासाची कामे केली आहेत. यानंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीचे या भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे विकासाची निर्माण झालेली पोकळी आपल्याला भरून काढून तालुक्यातील जनतेला भेडसणारे प्रश्‍न सोडवायचाआहेत. यासाठी शिट्टीच्या चिन्हासमोरील बटण दाबून मला संधी द्यावी, असे प्रतिपादन प्रीतम म्हात्रे यांनी केले आहे. तसेच, गावभेटी दरम्यान त्यांनी शिरढोण गावाला भेट देऊन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन केले. उरण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपामुळे अनेक विकासकामे रखडली असून, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा व या विभागातील इतर कामे शेतकरी कामगार पक्षांमुळेच झाली असल्याचेदेखील प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.

यावेळी विजय म्हात्रे, हेमंत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, राम भोईर, सुभाष पाटील, संतोष पाटील, विभागीय चिटणीस नाना मोरे, सरपंच वैशाली भोईर, पांडुरंग मुकादम, कांचन मुकादम, मोहन पवार, सागर भोईर, संग्राम भोपी, भरत भोईर, वासुदेव कर्णेकर, ऋषिकेश भोईर, भारत मुकादम, जगदीश मुकादम, भूषण म्हात्रे, योगेश मुकादम यांच्यासह शेकाप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version