पालिकेच्या बांधकाम विभागाच्या नावाने श्राद्ध

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेने परिसरातील रस्ते दुरुस्तीसाठी 100 कोटी खर्च केले आहेत. त्यामध्ये कामोठेमध्ये 10 कोटी खर्च केले आहेत. परंतु, एवढा खर्च करून देखील कामोठ्यात खंड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गासह स्थानिकांनी वेळोवेळी पालिकेला निवेदन दिले आहे. मात्र, पनवेल महानगरपालिका पावसाकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे कामोठेकरांना संपूर्ण गणोत्सव खड्ड्यातून मार्ग काढत साजरा करावा लागला. दरम्यान, पालिकेने चार-पाच मजूर लावून तात्पुरती रस्तेवरील खडी साफ करण्याचा दिखावा केला होता. परिणामी येथील खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. दुसरीकडे खड्ड्यांच्या बाजूला राजकीय नेत्यांच्या उत्सवाच्या कमानी पाहून सर्वसामान्य नागरिक आणखिनच रोष व्यक्त करत आहेत. त्यामुळे पालिकेच्या डिसाळ कारभाराला कंटाळून 10 दिवसांपूर्वी एकता सामाजिक संस्थेने रस्त्यावरील खडी साफ केली होती. तरीही पालिकेला काहीही फरक पडला नाही. त्यामुळे एकता सामाजिक संस्थेने सर्वपीत्री अमावस्याच्या दिवशी कामोठे पोलीस स्टेशन समोरील चौकात निषेध म्हणून पालिकेच्या रस्ते व बांधकाम खात्याचा फलक लावून श्राद्ध घातले, सोबत चार आणे नाणे ठेवून निषेध व्यक्त केला. यावेळी अमोल शितोळे, सचिन त्रिमूखे, प्रशांत कुंभार, ॲड. समाधान काशीद, अरुण जाधव, त्रिशा घोडे, उमेश गायकवाड, संगीता पवार आदी उपस्थित होते.

Exit mobile version