पेडलीच्या श्रद्धा तळेकरची कामगिरी कौतुकास्पद – चित्रलेखा पाटील, शेकाप नेत्या

। अलिबाग । प्रतिनिधी ।
आज रायगडमधील मुली विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. केवळ पुस्तकात आणि घरकामात न अडकता क्रिडा क्षेत्रातही त्याच उत्साहाने सहभागी होत आहेत, हे कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील क्रिडा संस्कृतीचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लवकरच भव्य स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. पेडलीतील श्रद्धा तळेकर हिची टोकियो येथील जिम्नॅस्ट स्पर्धेत निवड झाल्याबद्दल तिचे मनापासून कौतुक. तसेच मुलगी असूनही तिच्या पालकांनी तिला प्रोत्साहन, पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. भविष्यात तिला कोणतीही मदत लागल्यास शेकाप कायमच तिच्या पाठिशी राहून सर्वतोपरी मदत करेल, असा विश्‍वास शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी कृषीवलशी बोलताना व्यक्त केला.

पाली, पेडली या खेडेगावातील श्रद्धा साईनाथ तळेकर हिची टोकियो येथे जिम्नॅस्ट स्पर्धेसाठी निवड झाली असून तिने रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे सर्वत्र तिच्याच नावाची चर्चा सध्या सुरु आहे. सुधागड तालुका नररत्नांची खान म्हणून ओळखला जातो. तसेच रायगड जिल्ह्याने आजपर्यत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू या भूमीत घडवले, आनंदाची व अभिमानाची बाब म्हणजे सुधागड तालुक्यातील पेडली या छोट्याशा खेडेगावात जन्माला आलेल्या श्रद्धाने देशविदेशात जिम्नॅस्ट या खेळातून नाव कमावले असून तिची टोकियो येथे पुढच्या महिन्यात होणार्या जागतिक जिम्नॅस्ट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

पेडलीसारख्या छोट्याशा गावातील मुलगी भारताचे प्रतिनिधीत्व करणार असल्याने केवळ पेडलीकरांचेच नाही तर संपूर्ण रायगडकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.श्रद्धा तळेकरने अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी पदकांची कमाई केली असून या स्पर्धेत देखील तिच्याकडून भारतीय संघाला पदकाची अपेक्षा आहेत.

Exit mobile version