। माथेरान । वार्ताहर ।
श्रावण म्हणजे काय असे कोणालाही विचारले तरी सर्वाच्या समोर निसर्गाचं मनमोहक रूप उभे राहाते. श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा खेळ. अशी किती तरी श्रावणाची रूपे आपणाला सांगता येतील. माथेरानमध्ये श्रावणाची अशी अनेक निसर्गाने नटलेली रूपे आपल्याला सर्वत्र पाहवयास मिळतात. या महिन्यात येणार्यांना इथला निसर्ग त्यांच्या डोळ्यासमोर ठाण मांडून उभा राहिलेला असतो. इथली भूमी, डोंगर, कडे-कपार्यात सर्वत्र हिरवेगार झालेले दिसत असते. निसर्ग जणू हिरवागार शालू नेसून नव्या नवरीसारखा नटलेला दिसतो. डोंगरदार्यांमधील धबधबे किती बघू आणि किती नको असे वाटते.
श्रावणात पडणारा पाऊस हा देखील जणू जीवलग वाटणारा सखा असतो. कोणतेही नुकसान न पोहचवणार पाऊस अगदी उनाबरोबर लपंडाव खेळत असतो. याच महिन्यात येथील डोंगरावर येणारी सोनकीची फुले डोंगरदार्यांवर पसरलेला सोनकीची साज पर्यटकांना आणि इथल्या माथेरानकरांना नेहमीच आकर्षित करीत असतो. इथला निसर्ग जणू नवचैतन्याने न्हाऊन गेलेला असतो. असा हा विलोभनीय श्रावण सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो.