कराटे स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश
| हमरापूर | वार्ताहर |
काठमांडू येथे होणाऱ्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जिते गावची सुकन्या श्रावणी दिलीप म्हात्रे हिची भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धा 22, 23 व 24 मे रोजी पार पडणार आहेत. या स्पर्धेत भारतासह बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ या देशांचा समावेश आहे.
श्रावणी के.ई.एस.लिटिल एंजल्स स्कूल पेणची विद्यार्थिनी आहे. दहा वर्षांपूर्वी श्रावणी हिने कराटे या खेळण्यास सुरूवात केली. तालुका, जिल्हा, राज्य व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने अनेक सुवर्णपदके पटकाविली आहेत. जयपूर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली विद्यार्थिनी होती. तिचे कराटे गुरु प्रथमेश प्रकाश मोकल यांनी श्रावणीला जागतिक स्तरावर नेण्याचं स्वप्न समोर ठेवले आहे. श्रावणी आता सोळा वर्षांची असून, इतक्या कमी वयात तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक करण्यात येत आहे.
के.ई.एस. स्कूलचे सदस्य कृष्णा वर्तक, श्रावणीचे गुरु प्रथमेश मोकल व समाजसेवक राजेंद्र म्हात्रे यांनी श्रावणीच्या निवासस्थानी जाऊन या स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच स्कूल समितीचे चेअरमन मेरी पिंक, मुख्याध्यापिका तृप्ती वनगे, प्रीती कारखानीस यांनीही तिला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.