श्री अष्टविनायक टॅक्सी संघटनेचे उपोषण सुरू

अनधिकृत प्रवासी वाहतूक करणार्‍या कारवाईची मागणी

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणार्‍या श्री अष्टविनायक रिक्षा संघटनेच्या माध्यमातून सोमवार (दि. 1) पासून उपोषण सुरू केले आहे. या मार्गावर सुरु असलेल्या अनधिकृत वाहनांमधून प्रवासी वाहतूक केली जात असल्याने या चालकांनी उपोषण सुरू केले आहे.

श्री अष्टविनायक टॅक्सी चालक मालक संघटना ही नेरळ कळंब या मार्गावर प्रवासी वाहतूक करतात. मात्र नेरळ येथून कळंब या मार्गावर प्रवासी वाहतूक करताना गाडी कळंब येथे गेल्यावर तेथून एकही प्रवासी नेरळ येथे जाणार्‍या काळया पिवळ्या टॅक्सीमध्ये बसू देत नाहीत. तेथे असलेल्या खासगी इको वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यामुळे अनधिकृत प्रवासी वाहने यांच्या मधून वाहतूक करणारे प्रवासी यांच्या देखील जीवाला धोका असतो. मात्र त्या खासगी वाहनांवर पोलीस किंवा आरटीओ प्रशासन कोणतेही प्रकारची कारवाई करीत नाही. त्याचवेळी नेरळ कळंब या राज्यमार्ग 109 या रस्त्याचे काही भागात आरसीसी काँक्रिटकरण करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता आरसीसी काँक्रीटचे बनविण्यात यावा या मागणी श्री अष्टविनायक टॅक्सी संघटनेने करून आज पासुन उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाला युनियन अध्यक्ष संतोष भोईर, केशव तरे, अवि विरले, संजय दभडे, प्रशांत शहाणे, रमेश विरले, अंकूश दुर्गे, आत्माराम राणे, भूषण दभडे, यशवंत तरे, मयूर झिटे, विलास शींगटे, नंदलाल शिंगटे, जीवन राणे, नामदेव राणे, भुषण वेहळे, अनिल हजारे, शरद घाटे, निलेश गायकवाड, भालचंद्र कडव हे उपोषणाला बसले आहेत.

उपोषणकर्ते यांनी उपोषण सुरू झाल्यानंतर परिवहन विभागाचे पनवेल येथील पोलीस निरीक्षक कातेकर यांनी भेट घेवून अनधिकृत प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केली जाईल असे आश्‍वासन दिले. मात्र उपोषणकर्ते यांनी कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन देण्याची मागणी केली आहे, त्यामुळे उपोषण स्थगित होऊ शकले नाही.

Exit mobile version