श्रीसदस्यांचा लालपरीला आधार

जिल्ह्यातील विविध आगारातून 75 एसटी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

थोर निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा पुरस्कार सोहळा  खारघरमध्ये आयोजित करण्यात आला. या सोहळ्यासाठी रायगड जिल्ह्यातून 75 एसटी बसेस पाठविण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी श्री सदस्यांनी एसटी महामंडळाला पसंती दर्शविली. तोट्यात असलेल्या या एसटी महामंडळाला श्री सदस्यांच्या प्रवासामुळे आर्थिक बळ मिळाले आहे.

खारघर या ठिकाणी महाराष्ट्र भूषण 2022 हा सोहळा 16 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला. गेल्या महिन्याभरापासून या सोहळ्याची तयारी सुरु होती. या सोहळ्यात जाण्यासाठी श्री सदस्यांनी एसटी महामंडळाच्या एसटी बसला पसंती दर्शविली. एकूण 75 बसेसची मागणी जिल्हयातून करण्यात आली. एसटी महामंडळ रायगड विभागाने एकूण सहा एसटी बस आगारातून  एकूण 75 एसटी बसेसचे नियोजन  केले. त्यात अलिबाग आगारातून सहा, मुरुडमधून दोन, रोहामधून 12, श्रीवर्धनमधून 19, महाड व माणगावमधून प्रत्येकी 18 अशा बसेस पाठविण्यात आल्या. या एसटी बसमधून सुमारे तीन हजार पेक्षा अधिक श्री सदस्यांनी प्रवास केला. सकाळी कार्यक्रम असल्याने  शनिवारी मध्यरात्रीनंतर एसटी बसेस खारघरकडे रवाना झाल्या. श्री सदस्यांकडून एसटीला पसंती दर्शविल्याने एसटीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
थोर निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुरस्कार सोहळ्यास जाणार्‍या व परतीच्या मार्गावर असणार्‍या श्री सदस्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये यासाठी रायगड पोलीसामार्फत जिल्हयात कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षकांसह 517 पोलीस कर्मचारी व वाहतूक  पोलीस नाक्या नाक्यावर ठेवण्यात आले होते.

महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा सोहळा पार पडला. सोहळा पाहण्यासाठी येणार्‍या व सोहळा संपल्यावर परतीच्या मार्गावर जाणार्‍या श्री सदस्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. अवजड वाहनांना या कालावधीत बंदी घालण्यात आली. वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील  जुना मुंबई गोवा महामार्ग, खारपाडा-पोलादपूर, वडखळ-मुरुड, पाली फाटा ते वाकण फाटा, पाली ते निजामपुर अशा अनेक ठिकाणी एक अपर पोलीस अधीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधिकारी, 18 पोलीस निरीक्षक, 45 पोलीस उपनिरीक्षक व 450 पोलीस कर्मचारी व वाहतूक पोलीस तैनात केल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली.

Exit mobile version