श्रेयस, इशान मोसमपूर्व स्पर्धा खेळणार

| मुंबई | प्रतिनिधी |

देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट मोसम सुरू होण्याअगोदरची मोसमपूर्व स्पर्धा म्हणून तमिळनाडूतील बुची बाबू क्रिकेट स्पर्धा प्रसिद्ध आहे. या स्पर्धेत मुंबई संघातून श्रेयस अय्यर तर झारखंड संघातून इशान किशन खेळणार आहे. बुची बाबू या क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघातून सूर्यकुमार यादव पाठोपाठ श्रेयस अय्यरही खेळणार असल्याचे मुंबई क्रिकेट संघटनेने जाहीर केले आहे. त्याच वेळी झारखंड संघाचे नेतृत्व इशान किशन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रेयस अय्यर आणि इशान किशन या दोघांनी गतवर्षी बीसीसीआयकडून सूचना देऊनही रणजी क्रिकेट सामने खेळण्यास नकार दिला होता. श्रेयसने दुखापतीचे कारण दिले होते; परंतु राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून त्याला त्यावेळी कोणतीही दुखापत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परिणामी या दोघांसाठी राष्ट्रीय संघातले दरवाजे तर बंद करण्यात आले होतेच; पण वार्षिक करारातूनही वगळण्यात आले होते.

नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी श्रेयसची निवड करण्यात आली होती. भविष्यातही आपली संघासाठी विचार होण्याची शक्यता लक्षात घेऊन श्रेयस आणि इशान या दोघांनी बुची बाबू ही स्थानिक स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमारकडे टी-20 संघाचे नेतृत्व देताना त्याचा आता केवळ याच प्रकारासाठी विचार केला जाईल, असे निवड समितीने संकेत दिले होते. पण आपल्याला तिन्ही प्रकारांत खेळायचे आहे, अशी इच्छा सूर्यकुमार यादवने व्यक्त केली होती आणि यासाठी त्यानेही या बुची बाबू स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version