| मुंबई | प्रतिनिधी |
भारताचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरने पाठदुखीमुळे लाल चेंडूने होणाऱ्या सामन्यांतून तब्बल सहा महिने विश्रांती घेतली असल्याचे बीसीसीआयने गुरुवारी स्पष्ट केले. त्यामुळे श्रेयस आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतही खेळणार नाही. अशा स्थितीत श्रेयसचे कसोटी संघातील पुनरागमनाच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत, असे म्हणू शकतो.
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समितीने गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. तसेच ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत-अ संघही यावेळी जाहीर करण्यात आला. एकीकडे श्रेयस हा एकदिवसीय मालिकेत भारत-अ संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र, प्रथम श्रेणी क्रिकेटपासून त्याने सहा महिने दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. रणजी स्पर्धा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून फेब्रुवारीत अंतिम सामना रंगणार आहे. त्यामुळे श्रेयस संपूर्ण हंगामाला मुकणार असून तो आता प्रामुख्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करणार आहे.
तीस वर्षीय श्रेयस हा ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध सुरू असलेल्या चार दिवसीय कसोटी मालिकेत भारत-अ संघाचा कर्णधार होता. मात्र,पहिल्या लढतीत भारत-अ संघाचे नेतृत्व केल्यानंतर श्रेयसने मंगळवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या सामन्यातून माघार घेतली. पाठदुखीने यापूर्वीही श्रेयसला सतावले असून तो आता कधी परतणार, हे पाहणे रंजक ठरेल.






