उद्या मुगवली येथे श्री गणेश जन्मोत्सव

। माणगाव । प्रतिनिधी ।

श्री क्षेत्र मुगवली येथील श्री स्वयंभू गणपती मंदिरात उद्या मंगळवारी (दि.13) रोजी सालाबादप्रमाणे श्रींचा जन्मोत्सव संस्थेचे विश्‍वस्त यांनी करण्याचे ठरविले आहे. तरी या धार्मिक समारंभास भाविकांनी फार मोठ्या श्रद्धेने हजर राहून उत्सवानिमित्त होणारे कार्यक्रम शिस्तिने, शांततेने, उत्साहाने श्रींचे दर्शन घ्यावे.

मराठी मनाचे गणेश हे लाडके दैवत आहे, त्या गणेशाची पुजाअर्चा करूनच शुभकामाला सुरूवात केली जाते. कोकणात या गणेशोत्सव काळात भक्तीला उधाणच येते. गजाननाची अनेक रुपे आहेत. त्यापैकीच एक असलेल्या माणगाव जवळील मुगवलीच्या गणपतीचे स्थान हे जागृत म्हणून परिचीत आहे. शिवाय भक्तांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणूनही त्याची सर्वत्र ख्याती आहे.

रायगड जिल्हातील मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून 3 कि. मी. अंतरावर मुगवली फाटा आहे. तेथून अवघ्या दिड किमी अंतरावर हे स्वयंभू गणेश मंदिर आहे. सुमारे 325 वर्षापूर्वी मुगवलीच्या परिसरातील एका शेतात एक शेतकरी नांगरणी करीत असताना दगडाला नांगराचा फाळ लागून तेथून रक्त येऊ लागले. सर्व ग्रामस्थांनी याबाबत गोरेगावच्या जाणकारांचा सल्ला घेतला व हे गणेशाचे स्वयंभू महास्थान आहे, असे सांगितले. त्यानंतर सर्वांनाच नैसर्गिक अवस्थेतील गणेशाचे मोहक दर्शन झाले. ही मूर्ती जमिनीतून वर आलेल्या दोन फूट लांबी-रुंदीच्या पाषाणावर नैसर्गिक अवस्थेत असून, मस्तक, उभी वळलेली सोंड, पोट अशा स्वरुपाची आहे. मागील बाजूससिंह असून, त्यास पाठ टेकून खाली पाय सोडून तो बसलेला आहे. गणेशाचे नेत्र नैसर्गिक अवस्थेत असल्यामुळे त्याचे डोळे बोलके वाटतात.

श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त उद्या सकाळी सात ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या श्री गणेश जन्मोत्सव कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Exit mobile version