पाटणेश्वर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथे शिवशंभो क्रीडा मंडळ पाटणेश्वर आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत एकूण 48 संघांनी सहभाग घेत स्पर्धेला भव्य स्वरूप प्राप्त झाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात श्री पांडवा देवी रायवाडी संघाने विजेतेपद पटकावत आपला दबदबा सिद्ध केला. नवतरुण कारावी संघाने द्वितीय, टीडीएम कारावी संघाने तृतीय, तर नवतरुण तरणखोप संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला.
वैयक्तिक कामगिरीतही खेळाडूंनी चमक दाखवली. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब समाधान मोरे (श्री पांडवा देवी रायवाडी) यांनी पटकावला. सर्वोत्कृष्ट चढाईपटू म्हणून मिथुन मोकल (नवतरुण कारावी), तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हितेश म्हात्रे (टीडीएम कारावी) आणि पब्लिक हिरो संजोग पाटील (नवतरुण तरणखोप) यांना गौरविण्यात आले.स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुंद आणि पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे समालोचन रुपेश डाके आणि अलंकार मनवे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवशंभो क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
