| कोर्लई | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील नागाव येथे श्री समर्थ कोपर क्रीडा मंडळ आयोजित एकदिवसीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत रोहा येथील जयबजरंग संघाने बाजी मारत माजी सरपंच स्व. अरुण बाळकृष्ण म्हात्रे स्मृतिचषक पटकाविला. पेण पाटणेश्वर येथील शिवशंभू संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दि.25 फेब्रुवारी रोजी सेनेचे उपविभाग अधिकारी सूरज म्हात्रे मित्र मंडळ व कोपर आळी मित्र मंडळ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित अशा 24 संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या प्रथम क्रमांकास रोख रुपये 21,888/-, द्वितीय क्रमांक 11,888/-, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी रोख रुपये 8881/- व आकर्षक चषक ठेवण्यात आले होते.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर, उपसरपंच राकेश म्हात्रे, माजी सदस्य विकास पिंपळे, प्रसन्न म्हात्रे, अभय पाटील, सुनील राणे, सुहास राणे, आरडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, राकेश राणे, संतोष राऊळ, सचिन राऊळ, अनिल पाटील, सुरेंद्र नागलेकर, महाराष्ट्र श्री संजय उळे, सुरज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत अलिबाग धेरंड येथील मरीदेवी संघ व पांडवादेवी रायवाडी संघाने अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळविला. यावेळी जयबजरंग संघाच्या राकेश गायकवाड याला सर्वोत्कृष्ट खेळाडू, पाटणेश्वर येथील शिवशंभू संघाच्या विकी ठाकूर (पुष्पा) याला उत्कृष्ट चढाई, पांडवादेवी रायवाडी संघाच्या संकेत बानकर याला उत्कृष्ट पकडचे, तर मरीदेवी संघाच्या ऋषिकेश पाटील याला पब्लिक हिरो म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेला नागाव ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद लाभला. समर्थ कोपर क्रीडा मंडळ, ओमसाई मित्र मंडळ व माझा कट्टा मित्र मंडळाने स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.