| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कविवर्य कुसुमाग्रजांची जयंती दि. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी प्रतिवर्षी ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन व विविध स्पर्धा या उपक्रमांचे आयोजन यावेळी जे.एस.एम. महाविद्यालयात करण्यात आले होते. ग्रंथदिंडीची सुरुवात सार्वजनिक वाचनालय, अलिबाग येथे जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांच्या शुभहस्ते ग्रंथपूजनाने झाली. यावेळी जनता शिक्षण मंडळाच्या संचालिका तथा जिल्हा ग्रंथालय संघ आणि सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. भक्तिमय वातावरणात ग्रंथदिंडीमध्ये विविध वेशभुषेत विद्यार्थ्यी उत्साहात सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीत महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी, सार्वजनिक वाचनालयातील पदाधिकारी, ग्रंथालय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यानंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता अॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डायमंड प्रकाशन, पुणे व महाराष्ट्र बुक सेल, अलिबाग यांचेद्वारा शैक्षणिक तसेच कथा, कादंबरी, चरित्र, नाटक, कविता अशा वाचन साहित्यातील दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रश्नमंजुषा व बोला मराठीत या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा आणि वाङमय अभ्यास मंडळ, ग्रंथालय व माहिती स्त्रोत विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. यावेळी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उप-प्राचार्य डॉ.एन.एन.शेरे, प्रा.बी.भालेराव, प्रा.प्रवीण गायकवाड, प्रा.प्रेम आचार्य, प्रा.कपिल कुलकर्णी, प्रा. सुबोध डहाके, प्रा. पंकज घरत, प्रा. सिमंतिनी ठाकूर, प्रा. सुरभी वाणी, सौ.स्नेहा ठाकूर, श्री गीते उपस्थित होते.