नेरळ येथील 1938 साली बांधलेले श्रीराम मंदिर

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ येथे बदले कुटुंबाच्या मालकीचे श्रीराम मंदिर असून या मंदिराची उभारणी 1938 साली झाली आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत असताना नेरळ येथील मंदिरात मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

1938 साली भालचंद्र गणपत बदले आणि अनिल कृष्णाजी बदले यांनी बदले कुटुंबाच्या जमिनीवर मंदिराची उभारणी केली. नेरळ गावात त्यावेळी याच भागात बाजारपेठ होती आणि देश पारतंत्र्यात असताना श्रीराम मंदिराची उभारणी केली गेली होती. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्ती अशी मंदिरातील गाभार्‍याची रचना असून कौलारू दुमजली वास्तू उभारली आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी सागवान लाकडे वापरण्यात आली होती. मंदिराचे व्यवस्थापन श्रीराम देवस्थान ट्रस्टकडून केले जाते. सध्या मंगेश बदले आणि सुशांत बदले हे मंदिराचे व्यवस्थापन पाहत असून हे मंदिर नेरळ ग्रामस्थांसाठी कायम खुले असते. श्रीराम जन्मोत्सव आणि श्री कृष्ण जन्माष्टमी या काळात मंदिरात मोठे उत्सव असतात. यावेळी श्रीराम नवमीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version