। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
फुंडे येथील श्रीराम मंदिराच्या जमिनीचे वाढीव पैसे अवैध मार्गाने पंच अशोक परशुराम ठाकूर यांनी घेतले. तसेच महादेव एकनाथ घरत यांनी वेगवेगळ्या खोट्या पावत्या बनवून देणगी गोळा करीत भ्रष्टाचार केल्याबाबतचा गुन्हा न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्या प्रकरणात कोणास अटक केले व गुन्ह्याच्या तपासणीची माहिती देण्यात यावी, अशी मागणी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली.
उरण तालुक्यातील फुंडे येथील श्रीराम मंदिराची देखभाल करण्यासाठी ग्रामस्थांनी 1963 साली श्रीराम देव व श्री विठोबा देव फुंडे अशा नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत सर्व धार्मिक कार्यक्रम व मंदिराची देखभाल करण्यात येत होती. श्री रामदेव व श्री विठोबादेव फुंडे या ट्रस्टच्या नवीन विश्वस्ताची स्थापना करण्यासाठी माजी सरपंच महादेव घरत यांनी विश्वस्तांची नावे वाढविणे व कमी करण्याचे ठराव तसेच श्रीराम मंदीराचा जीर्णोद्धार करण्याच्या ठरावावर व प्रोसिडींगवर सागर श्रीधर घरत व फुंडे गावातील ग्रामस्थांच्या खोट्या सह्या करून बनावट कागदपत्रे बनविली. त्यानूसार महादेव घरत यांनी स्वतःला विश्वस्त बनवून घेतले असल्याबाबतची तक्रार जुलै 2021 रोजी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात सुमारे 300 पेक्षा जास्त नागरिकांनी सह्या करून देण्यात आली आहे.
महादेव घरत आणि इतर विश्वस्तांनी ग्रामस्थ, व्यापारी, अधिकारी, ठेकेदार व श्रीराम भक्तांकडून दानाच्या स्वरूपात मंदिर बांधकामाकरिता न्यासाची कलम 41 क नुसार परवानगी न घेता खोट्या पावत्या छापून करोडो रूपयांची देणगी गोळा केली आहे. तसेच श्रीराम देव व श्री विठोबादेव न्यासाच्या नोंदणी क्रमांकाचा वापर करून श्रीराम मंदीर जिर्णोद्वार कमिटी फुंडेच्या नावाने वेगळ्या पावत्या छापून देणगी गोळा केली.
त्याचप्रमाणे श्री रामदेवाच्या नावावर असलेली शेती सिडको प्रशासनाने संपादीत केलेली असून जमिनीचे वाढीव पैसे अवैध मार्गाने पंच अशोक ठाकूर यांनी घेतले. भक्तांच्या धार्मिक भावना दुखावत यांनी भ्रष्टाचार केल्याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांची चौकशी केली का, याबाबत माहिती देण्याची मागणी आ. जयंत पाटील यांनी केली आहे.