श्रीराम विश्‍वस्त मंडळ अंतिम विजेते

| मुंबई | प्रतिनिधी |

श्री सिद्धेश्‍वर मंडळाने उमेश गावडे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेत श्रीराम विश्‍वस्त मंडळ अंतिम विजेते ठरले. श्रीराम विश्‍वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला ओवन देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रभादेवीतील राजाराम साळवी उद्यानातील स्व. सचिन अनंत शेलार क्रीडांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीराम विश्‍वस्त मंडळाने एस. एस. जी. फाऊंडेशनचा 41-23 असा सहज पराभव करीत भव्य चषक, बोकड व रोख रु. पाच हजार एकशे चौर्‍यान्नव आपल्या नावे केले. उपविजेत्या एस.एस.जी.ला चषक, कोंबड्या व रोख रु. चार हजार एकशे चौर्‍यान्नववर समाधान मानावे केले.

या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात श्रीरामने सिद्धीप्रभाला 34-28 असे, तर एस.एस.जी. फाऊंडेशनने शिवनेरी मंडळाचा सुवर्ण चढाईत यश राक्षेची पकड करीत 38-37(7-6) असा विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु. तीन हजार दोनशे देऊन गौरविण्यात आले. एस.एस.जी. च्या दिवेश गवळीला स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा, तर श्रीरामच्या सौरभ माळीला स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचा खेळाडू म्हणून कुलर देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू ठरला तो शिवनेरीचा यश राक्षे. त्याला फॅन देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version