| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
एकेकाळी रायगड विभागात एक नंबरचे उत्पन्न मिळवणारे आगार अशी श्रीवर्धन परिवहन आगाराची ख्याती होती. परंतु, मागील तीन-चार वर्षांपासून श्रीवर्धन आगाराला समस्यांचे ग्रहणच लागल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वर्ष जुन्या झालेल्या बस गाड्या श्रीवर्धन आगारात आहेत. अनेकवेळा प्रवासादरम्यान गाड्यांच्या चाकांचे नटबोल्ट निघणे, गाडीचे चाक निखळणे, गाडीचे इंजिन ओव्हर हिट होणे, टायर पंक्चर होणे या समस्या नित्याच्याच झाल्या आहेत. याव्यतिरिक्त श्रीवर्धन आगारातून ज्या वेळापत्रकानुसार बस सुटणार असते, त्या वेळापत्रकानुसार केव्हाच बस सुटत नाहीत. कायम अर्धा तास, एक तास उशिरानेच बस सेवा सुरू असतात.
चार महिन्यांपूर्वी श्रीवर्धन बस आगारात पाच नवीन बस गाड्यांचा ताफा दाखल झाला. परंतु, या बसेस फक्त बीड, लातूर, सातारा या मार्गावरती चालवल्या जातात. मुंबई, ठाणे, भाईंदर, नालासोपारा, बोरीवली, कल्याण या मार्गावरती नेहमीच भंगार व खटारा बसेस पाठवल्या जातात. श्रीवर्धन आगारात असलेल्या शिवशाही बसेस देखील तीन ते चार वर्षे जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे यामधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडणे, बसेसमधील सीट मागेपुढे न होणे, अशा समस्या नियमित येत असतात. आगारातून सुटणाऱ्या बस या नियमितपणे स्वच्छ सुद्धा केलेल्या नसतात. अनेकवेळा धूळ, कचरा आसनांवरती साचलेला पाहायला मिळतो.
परिवहन मंडळाकडून नको असलेल्या गोष्टींसाठी विनाकारण खर्च होत असल्याचे पाहायला मिळते. श्रीवर्धन बस स्थानकामधील आसनांवर असलेल्या लाद्या, त्याचप्रमाणे खालील फ्लोअर वरच्या लाद्या सुस्थितीत असताना सुद्धा त्या काढून त्या ठिकाणी नवीन लाद्या लावण्याचे काम हातात घेण्यात आले होते. महामंडळाने असा फालतू खर्च करण्यापेक्षा आगारात नवीन बसेस पुराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.







