। माणगाव । प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पक्षाच्या चिटणीसांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये शेकापचे सर्वेसर्वा तथा सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या चिटणीसपदी माणगाव तालुक्यातील मोर्बा गावचे शेकापचे ज्येष्ठ नेते यांच्या नावाची अधिकृत घोषणा करून त्यांचे अभिनंदन केले.
अस्लम राऊत हे शेकापचे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून तालुक्यात सर्वत्र ओळखले जातात. सन 1988 पासून अस्लम राऊत हे शेकापमध्ये असून, ते मोर्बा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दि.17 जुलै 1988 रोजी विराजमान झाले होते. शेकाप नेते स्व. प्रभाकर पाटील हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन अस्लम राऊत यांनी शेकाप स्वीकारला होता. राऊत हे शेकापमधून सन 1992, 1997 व 2012 असे सलग तीन वेळा मोर्बा जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेवर निवडूण गेले होते.
अस्लम राऊत यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले असून, आता ते या बँकेच्या संचालक पदावर काम पाहात आहेत. सन 1992 मध्ये त्यांची रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतीपदी निवड करण्यात आली.पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षश्रेष्ठीनी त्यांना बढती देऊन चिटणीसपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच विविध पक्षातील मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीबद्दल प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना अस्लम राऊत म्हणाले की, पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी व त्यांच्या सर्व सहकार्यांनी माझ्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवून चिटणीसपदी नियुक्ती करून मला जनतेची सेवा करण्याची व विकासकामे करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे तसेच पक्षाच्या सर्व ज्येष्ठ मंडळींचे ऋण व आभार व्यक्त करतो.