वन विभागाच्या जागेवर उघडपणे अतिक्रमण
शासनाचे आदेश धाब्यावर बसवून बेकायदेशीर व्यवसाय सुरू
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला श्रीवर्धन तालुका सध्या विविध समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. त्यातच श्रीवधन समुद्रकिनारा सध्या बेकायदेशीर टपऱ्यांच्या विळख्यात सापडला आहे. येथील संपूर्ण किनारपट्टीवर ‘टपरी माफियांनी’ कब्जा केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. त्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य लोप पावत चालले आहे. वन विभागाच्या मालकीच्या जागेवर उघडपणे अतिक्रमण करून टपऱ्या उभ्या राहत असताना प्रशासन मात्र पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका पर्यटनासाठी प्रसिद्धीस आहे. तालुक्यातील निसर्गरम्य वातातवरण, येथील सुखसुविधा, स्वच्छ समुद्रकिनारे व मंदिरांना दरवर्षी राज्यभरातील हजारो पर्यटक भेटी देत असतात. तसेच, श्रीवर्धन शहराला ऐतिहासिक असे महत्त्व देखील आहे. थोरले बाजीराव पेशवे यांचे वडील बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे हे जन्मस्थळ आहे. असे असतानाही श्रीवर्धन वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासले आहे. त्याचा परिणाम येथील पर्यटनावर होण्याची भीती स्थानिक व्यावसायिकांना पडली आहे. या ठिकाणी नियम, कायदे आणि शासनाचे आदेश धाब्यावर बसवून बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे पर्यावरण, सुरक्षा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत.
श्रीवर्धन शहरात आधिच अरूंद रस्ते आणि वाहनतळाची मोठी समस्या आहे. अशातच येथील समुद्रकिनारी दिवसेंदिवस अनधिकृत टपऱ्यांचे जाळे पसरत चालले आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आपले वाहन लावताना मोठी अडचण निर्माण होते. तसेच, जिथे भेटेल त्या ठिकाणी वाहन उभ्ो केले जाते. त्यामुळे येथील पार्किंगचा बोजवारा उडाला असून, वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत चालली आहे. परिणामी समद्रकिनारी येणाऱ्या सर्वांचीच गैरसोय होते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे कोणत्यातरी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कृपाशिर्वादामुळेच त्यांना संरक्षण मिळत असून वन विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच, येथील समुद्राच्या लाटांपासून संरक्षणासाठी बांधलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरच टपरी धारकांकडून टेबल-खुर्च्या टाकून पर्यटकांना जेवण दिले जात आहे. त्याचबरोबर त्या टपरी धारकांकडे फूड लायसन्स नाही. तसेच, संबंधित विभागाकडून आरोग्य तपासणी होत नाही, ना आपातकालिका सुविधा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे थेट पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल स्थानिकांमधून उपस्थित होत आहे. तसेच, येथील स्मशानभुमीला देखील अनधिकृत टपऱ्यांचा विळखा बसला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाताना नागरिकांना मोठी अडचण निर्माण होते. त्यांना या टपऱ्यांमधून वाट काढावी लागते. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबियांनाही अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
श्रीवर्धन समुद्रकिनारी नगर परिषदेने ‘स्टॉल लावण्यास मनाई’ असे फलक लावले आहेत. तरीदेखील त्या फलकाच्या सावलीत बेकायदेशीर टपऱ्यांचा धंदा जोरात सुरू आहे. त्यामुळे हे फलक केवळ दिखाव्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नुसत्या नोटिसा आणि आश्वासनांचा खेळ आता थांबवावा, अशी मागणी जोर धरत आहे. वन विभाग, नगर परिषद आणि महसूल विभागाने तात्काळ संयुक्त कारवाई करून हे अतिक्रमण हटवावे, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.
बेकायदेशीरांचा ‘धंदा’ तेजीत
श्रीवर्धन समुद्रकिनारी बेकायदेशीरांचा ‘धंदा’ तेजीत सुरु आहे. कोणतीही परवानगी नसलेले टपरीधारक लाखोंची कमाई करत आहेत. मात्र, शासनाचे सर्व नियम पाळून, कर भरून व्यवसाय करणारे हॉटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे हा कोणता न्याय? ही तर प्रामाणिकपणाची शिक्षा, असा संतप्त सवाल स्थानिक व्यापारी वर्गातून विचारला जात आहे.
निसर्गाचा ऱ्हास
श्रीवर्धन समुद्रकिनारा सध्या ‘कचराकुंडी’ बनण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी उघड्यावर मोठ्या प्रमाणवर कचरा टाकला जात आहे. त्यात सर्वाधिक कचरा प्लास्टिकच्या वस्तूंचा आहे. येथील अस्वच्छतेमुळे परिसरात सर्वत्र घाण पसरली असून त्यातून निघणाऱ्या दुर्गंधीचा सामना स्थानिकांसह पर्यटकांना देखील करावा लागत आहे.
