टक्केवारीच्या कारभारात श्रीवर्धनकर तहानलेलेच; नळ पाणी योजनेचा पुरता बोजवारा
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या राज्याच्या अधिकृत दुष्काळी यादीत संपूर्ण रायगड जिल्ह्यातून केवळ श्रीवर्धन तालुक्यावर कृत्रिम दुष्काळाचे भीषण संकट घोंगावत आहे. निसर्गाने भरभरून देऊनही श्रीवर्धनकरांना पाण्यासाठी वणवण का करावी लागणार आहे? या संतप्त प्रश्नाने सध्या संपूर्ण रायगड जिल्ह्यासह श्रीवर्धन तालुक्यात प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या भीषण परिस्थितीमागे कोणतीही नैसर्गिक आपत्ती नसून, श्रीवर्धनकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून राबवण्यात आलेली रानवली धरण नळ पाणी योजना आणि त्यामध्ये झालेला अवाढव्य भ्रष्टाचार हेच खरे कारण असल्याचे आता उघड होत आहे. प्रशासकीय ढिसाळपणा, अधिकाऱ्यांची उदासीनता आणि लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीच्या कारभाराने या योजनेचा पुरता फाज्जा उडाला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, यंदाच्या मान्सून हंगामात जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत श्रीवर्धन तालुक्यात एकूण 2,500 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात तर तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. निसर्गाने एवढी मोठी कृपा केली असताना आणि अद्यापही पावसाचा परतीचा प्रवास सुरू असताना, मुख्य रानवली धरणात अवघा 35 टक्केच पाणीसाठा शिल्लक का राहिला? हा साठा फार-फार तर आगामी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यापर्यंतच पुरेल असा अंदाज आहे. मुसळधार पाऊस पडूनही धरणात पाणी का साठले नाही आणि साठलेले पाणी गेले कुठे? सतत फुटणाऱ्या पाईप लाईन मुले हजारो लिटर पाणी वाया गेले या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ऐन हिवाळ्यात श्रीवर्धन शहरात पाण्याचा तीव्र भडका उडून श्रीवर्धनमध्ये अक्षरशः पाणी पेटणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक राजकीय वर्तुळातून आणि सामाजिक स्तरातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर काही ज्येष्ठ नागरिकांनी आणि विरोधी कार्यकर्त्यांनी थेट आरोप केला आहे की, “शहरातील टक्केवारीची चोरी आणि भ्रष्टाचाराची नग्न रूपे उघड्यावर पडू नयेत म्हणून श्रीवर्धन मतदार संघावर राज्य करणाऱ्या घराणेशाहीचा एक विशिष्ट असा राजकीय खेळ अत्यंत पद्धतशीरपणे सुरू आहे. विकासकामांच्या नावाखाली स्वतःची घरे भरणारे हे नेते जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. मात्र, आगामी काळात जेव्हा नळाला पाणी येणार नाही आणि तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल, तेव्हा श्रीवर्धनची जनता या भ्रष्ट कारभाराचा आणि नेत्यांचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे बोलले जात आहे.
मलिदा खाण्याच्या वृत्तीमुळे लूट!
रानवली धरण नळ पाणी योजना सुरू झाल्यापासून ती श्रीवर्धनकरांसाठी वरदान ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या योजनेची मुख्य पाइपलाइन आतापर्यंत तब्बल 100 पेक्षा जास्त वेळा फुटली आहे. प्रत्येक वेळी पाईप फुटल्यानंतर दुरुस्तीच्या नावाखाली सुमारे 50 ते 60 हजार रुपये खर्च केले जातात. म्हणजेच केवळ तात्पुरत्या दुरुस्तीच्या नावाखाली आजवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. कंत्राटदारांचे निकृष्ट दर्जाचे काम, अधिकाऱ्यांचे त्या कंत्राटदारांना असलेले मूक समर्थन आणि फक्त स्वतःचा मलिदा (टक्केवारी) खाण्याच्या वृत्तीमुळेच हा प्रचंड आर्थिक भुदंड सर्वसामान्य, करदात्या श्रीवर्धनकरांच्या माथी मारला जात आहे.
जनआंदोलनाचा उद्रेक होण्याची शक्यता
पावसाचे प्रमाण योग्य असूनही केवळ नियोजनाचा अभाव, अकार्यक्षमता आणि भ्रष्ट कारभारामुळे जनतेला कृत्रिम दुष्काळाच्या खाईत लोटले जात आहे. नोव्हेंबर-डिसेंबरनंतर निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीबाणीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाकडे सध्या कोणतीही ठोस पर्यायी योजना उपलब्ध नाही. ही गंभीर परिस्थिती वेळीच सुधारली नाही, पाइपलाइनचे काम कायमस्वरूपी दर्जेदार केले नाही आणि रानवली धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले नाही, तर आगामी काही दिवसांत श्रीवर्धनमध्ये पाण्यासाठी मोठा जनक्षोभ उसळण्याची आणि संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याची चिन्हे दिसत आहेत.
रानवली धरण नळ पाणी योजनेच्या निकृष्ट कामामुळे आणि वारंवार फुटणाऱ्या पाइपलाइनमुळे आज श्रीवर्धनकरांवर ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असला, तरी प्रशासकीय ढिसाळपणामुळे धरणात केवळ 35 टक्के पाणी शिल्लक राहणे हे गंभीर आहे. पाइपलाइनच्या नावाखाली होणारी करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी थांबवून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास, जनतेला सोबत घेऊन आम्ही तीव्र आंदोलन छेडू.
देवेंद्र भुसाने,
गटनेते, श्रीवर्धन नगरपरिषद
