| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरात विकेंड आणि जोडून सुट्ट्या आल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू असते. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमुळेच येथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळत आहे. श्रीवर्धनमध्ये बहुतांश पर्यटक हे कुटुंब वत्सल असतात. परंतु, काही गुंड प्रवृत्तीच्या पर्यटकांमुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे श्रीवर्धन बदनामीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा स्थानिकांमधून होत आहेत.
काही वर्षांपासून श्रीवर्धन येथे पर्यटक येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्थानिकांनी आपल्या घराच्या परिसरात खाणावळ, चहा-नाश्ता व पाण्याची व्यवस्था करीत आपल्या उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त केले आहे. तसेच, आपल्या घरात होम स्टे, वाड्यांमधुन वातानुकूलित खोल्या उभारत पर्यटकांसाठी निवासाची उत्तम व्यवस्था केली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु, या ठिकाणी येणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या पर्यटकांमुळे श्रीवर्धनचे नाव बदनामीच्या वाटेवर चालले आहे. अशा टवाळ पर्यटकांकडून समुद्र किनाऱ्यावर खुलेआम मद्यपान करणे, शहरातील अथवा किनाऱ्यावरील व्यावसायीकांना किरकोळ कारणावरून धक्काबुक्की करणे असे प्रकार वारंवार घडतात. तसेच, रिसॉर्ट चालक किंवा होम स्टे मालकाशी खोली भाड्यावरुन वादविवाद करतांना देखील आढळतात. काही महिन्यांपूर्वी हरिहरेश्वर येथे होम स्टे मालकाच्या बहिणीला मद्यपी पर्यटकांनी गाडी खाली चिरडून ठार मारल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर काही दिवसांसाठी श्रीवर्धन पोलीसांकडून पर्यटकांच्या वाहनांची तपासणी तसेच श्रीवर्धन व हरिहरेश्वर येथील प्रवेशद्वाराजवळ तपासणी केंद्र उभारण्यात आली होती. परंतु, श्रीवर्धन येथील अनेक रिसॉर्ट, होम स्टे चालक पर्यटकांचे आधारकार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स बघणे किंवा आलेल्या पर्यटकांची ओळख पटेल अशी कुठेही नोंद करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.पर्यटन व्यावसायिकांच्या या बेजबाबदार वृत्तीने श्रीवर्धन येथे अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार आणि अनैतिक व्यवसायाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रिसॉर्ट, होम स्टे चालकांनी आलेल्या पर्यटकांच्या सर्व नोंदी घेऊनच मुक्कामासाठी खोल्या द्याव्यात, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.






