श्रीवर्धन-मुरुड जलमार्ग बनला गैरसोयीचा

दिघी जेट्टीवर सोयी-सुविधांचा अभाव
मेरिटाईम बोर्ड लक्ष देईल का?

। दिघी । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून श्रीवर्धन व मुरुड या दोन तालुक्यांना सागरी मार्गाने जोडण्यात आले आहे. मात्र, या मार्गावर जलवाहतुकीचा प्रवास करताना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून प्रवाशांना सोयी-सुविधांचा अभाव जाणवत आहे. त्याचा फटका येथील पर्यटनाला बसत आहे.
श्रीवर्धन येथून मुरुडकडे जाण्यासाठी जलप्रवास सुखकर असल्याने दररोज मोठ्या संख्येने प्रवासी बोटीने ये-जा करतात. दिघी ते पलीकडे दांडा जलप्रवासास अवघी 15 मिनिटे लागतात. शिवाय, जलवाहतुकीचे दरही आवाक्यात असल्याने दररोज अनेक प्रवासी जलप्रवासाला प्राधान्य देतात. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड प्रवाशांंच्या सुविधांंकडे दुर्लक्ष करीत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर तर मुरुड, जंजिरा किल्ला, काशीद ही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत.

रात्रीच्या वेळी अंधार
दिघी येथील जेट्टीवर विजेचे खांब बसवण्यात आले. मात्र, दिवे बंद आहेत. त्यामुळे जेट्टीवर अंधार असून, उशिरा प्रवास करणार्‍या प्रवाशांना अंधारातून चाचपडत यावे लागते. तर, आजूबाजूला समुद्राच्या अजस्र लाटा व रस्त्यावरील अंधार पाहून वाहन चालकांना व पादचार्‍यांना अचानक समुद्रात पडण्याची भीती असते.

शौचालयाविना महिलांची गैरसोय
आगरदांडा जेट्टीवर प्रवाशांसाठी असणारे शौचालय मोडकळीस आले असून, बंद आहे. स्वच्छतागृहांअभावी प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. असे विदारक वास्तव असून, लोकांची विशेषत: महिलांची कुचंबणा होते.

वादळी पावसामुळे आगरदांडा येथील शौचालयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना टर्मिनल येथील स्वच्छतागृहात सुविधा मिळत आहे.
यशोधन कुलकर्णी, बंदर निरीक्षक

Exit mobile version