श्रीवर्धनची झेप ‘ब्लू फ्लॅग’च्या दिशेने

वन पर्यटनातून निसर्ग जनजागृती

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

नयनरम्य समुद्रकिनारा आणि समृद्ध निसर्गसंपदा लाभलेल्या श्रीवर्धनच्या सौंदर्यात आता ‘वन पर्यटन प्रकल्पा’मुळे मोलाची भर पडणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळणार नसून, निसर्ग आणि जैवविविधतेबाबत पर्यटकांमध्ये जनजागृती घडवून आणणे शक्य होणार आहे.

या पर्यटन प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्‌‍य म्हणजे सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून देणारे सुंदर पुतळे या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. आरोग्य आणि निसर्गाचा मिलाफ साधणारा हा उपक्रम पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरेल. तसेच पर्यटकांना निसर्गाच्या अधिक जवळ नेण्यासाठी विविध जंगली प्राणी आणि जलचर प्राण्यांच्या हुबेहूब व आकर्षक प्रतिकृती या परिसरात उभारण्यात आल्या आहेत.

आकर्षक माहिती फलकांद्वारे निसर्ग साक्षरता पर्यटकांमध्ये निसर्ग आणि जैवविविधतेबद्दल साक्षरता निर्माण व्हावी यासाठी परिसरात विशेष माहिती फलक लावण्यात आले आहेत. यामध्ये जलचर प्राणी, जंगली प्राणी, दुर्मिळ फुलपाखरे आणि जंगलातील दुर्मिळ फुले यांची रंजक व सविस्तर माहिती देणारे आकर्षक फलक लावण्यात आले आहेत. याशिवाय, श्रीवर्धन तालुक्यात गिधाडांसारखे दुर्मिळ होत चाललेले पक्षी आणि त्यांची घटती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील दुर्मिळ गिधाडे, धनेश, समुद्री घार यांसारख्या विविध जातींच्या पक्ष्यांची सविस्तर माहिती देणारे फलकही येथे लावण्यात आले आहेत. यामुळे पक्षी निरीक्षण आणि संवर्धनाला मोठा वाव मिळेल. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला मिळालेले ‘ब्लू फ्लॅग बीच’ हे मानांकन कायमस्वरूपी मिळवण्यासाठी वनविभागाच्या जागेवर स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यीकरण आणि स्वच्छता राखून श्रीवर्धनला कायमस्वरूपी ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. सुरूची झाडे ही किनाऱ्याचे वादळांपासून रक्षण करणारे नैसर्गिक कवच आहेत, त्यांचे संरक्षण या प्रकल्पाद्वारे होईल. त्याचसोबत ऑलिव्ह रिडले कासव आणि दुर्मिळ गिधाडांसारख्या घटकांची माहिती देऊन. या प्रकल्पाचा थेट फायदा स्थानिक तरुणांना रोजगाराच्या रूपात होणार आहे.

स्वप्नील चंबुले
वनपरिक्षेत्र अधिकारी, श्रीवर्धन
Exit mobile version