दिवाळीच्या दिवशी श्रीवर्धनकर अंधारात

महावितरणच्या अधिकार्‍यांचे फोन बंद

| दिघी | वार्ताहर |

दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून संपूर्ण देशात साजरा होत आहे. मात्र, श्रीवर्धन महावितरणच्या नियोजनच्या अभावामुळे तालुक्यातील जवळपास पन्नासहून अधिक गावात वीज नसल्याने अंधार पसरला आहे.

परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडताच विजेचा लपंडाव सुरू होतो. फक्त पावसाची सुरूवात झाली रे झाली की येथील वीज गायब होत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. काही वेळेला वादळ-वार्‍यात दक्षता म्हणून वीज बंद केली जाते. मात्र, सध्या आठवडाभरात पाऊस ना वादळ, तरी अचानक ऐन दिवाळीच्या दिवशी महावितरण विभागाने दिवे लावल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

श्रीवर्धन शहरातील सबस्टेशनवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगून महावितरण अधिकार्‍यांनी हात वर केले आहेत. परंतु, श्रीवर्धनमध्ये वीज वितरण कार्यालयाचा नेहमीच ढिसाळ व निष्क्रिय कारभार दिसून येतो. यंत्रणेच्या कमकुवतपणामुळे नागरिकांना सणासुदीला अंधारात बसावे लागत आहे. रोज दिवसा दर अर्ध्या तासाला विजेचा लपंडाव असायचा. आता तर दिवसभर विजेअभावी ऑक्टोबर महिन्यातील उष्णता नागरिकांना सोसावी लागत आहे. किमान दिवाळीच्या आधी तरी तत्परता दाखवून अंधार दूर करणे अपेक्षित होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Exit mobile version