मोकाट घोड्यांमुळे श्रीवर्धनकर त्रस्त

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन शहरामध्ये सध्या मोकाट फिरणारे घोडे गुरे यांनी अक्षरशः नागरिकांना त्रास दिला आहे. मोकाट घोडे आणि गुरे अनेकांच्या वाड्यांमध्ये शिरून झाडांची नासाधुस करतात. श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याकडे जाताना मधल्या भागामध्ये अनेक नागरिकांची भातशेती होती. भात शेती कापून झाल्यानंतर या ठिकाणी वाल, चवळी, मूग, उडीद अशी पिके घेतली जायची. परंतु, मोकाट घोड्यांच्या त्रासामुळे नागरिकांनी आता शेती लावणे देखील सोडून दिले आहे. शेताभोवती कितीही चांगल्या प्रकारे कुंपण घातले तरी घोडे त्याच्यावरून उडी मारून आतमध्ये जाऊन पीक फस्त करतात.

हे घोडे हे मेटकर्णी व रानवली या परिसरातील नागरिकांचे आहेत. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरती घोड्याची सवारी, घोडा गाडी यासाठी आणलेले घोडे आता पावसाळा सुरू झाल्यामुळे काम नसल्यामुळे मोकाट सोडून दिलेले आहेत. एरवी सुद्धा घोडा गाडीवाले व घोडेस्वार वाले दिवसभर धंदा केल्यानंतर संध्याकाळी घोडे मोकाट सोडून देत असतात. त्यामुळे घोड्यांचा उपद्रव हा नेहमीच होत असतो. काही दिवसांपूर्वी भर गर्दीच्या वेळी श्रीवर्धन बाजारपेठेमध्ये एक घोडा उधळला होता व त्याने अनेक दुचाकी स्वरांना जखमी केले असते. सुदैवाने गाड्या सोडून दुचाकीस्वार बाजूला गेल्यामुळे ते वाचले. घोडे दिवस रात्र श्रीवर्धन शहरातील रस्त्यांवरून फिरत असतात व आपली लीद देखील त्या ठिकाणी टाकत असल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे वातावरणात देखील दुर्गंधी पाहायला मिळत आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे पाऊस पडल्यानंतर ही लीद अजून रस्ता भर पसरते. श्रीवर्धन नगरपरिषदेकडे अनेक वेळा नागरिकांनी अर्ज विनंती केल्या व मोकाट घोडे व गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. परंतु, नगरपरिषद प्रशासनाकडून घोडे मालकांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळेच घोडे सर्वत्र मोकाट फिरत आहेत. त्यामुळे नगर परिषदेत निवडून गेलेले लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी तातडीने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व घोड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Exit mobile version