| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरासह रानवली, गालसुरे, बापवन आणि निगडी या चार खेडेगावांची तहान भागवणाऱ्या रानवली धरणाची यावर्षी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे धरणातील पाणी साठ्यात प्रचंड घट झाली असून, श्रीवर्धनकरांवर पाणी टंचाईचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रानवली धरणाची पूर्ण संचय पातळी 121.00 मीटर इतकी आहे. मात्र, सध्या धरणाची पाणी पातळी जेमतेम 116.00 मीटरवर येऊन ठेपली आहे. पावसाची अनियमितता लक्षात घेता यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरणे अत्यंत कठीण दिसत आहे. सन 1977 मध्ये पूर्णत्वास आलेल्या या धरणामुळे गेल्या अनेक दशकांत श्रीवर्धन शहराला कधीही भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला नव्हता. परंतु, यंदा धरण पूर्ण न भरल्यास ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी बिकट अवस्था निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रानवली धरणाला कोणताही नैसर्गिक जिवंत पाण्याचा स्त्रोत नाही. केवळ पावसाळ्यातील चार महिन्यांत सभोवतालच्या डोंगर उतारावरून वाहून येणारे पाणी हाच या धरणातील साठ्याचा मुख्य आधार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून धरणालगतच्या डोंगरांवर सुरू असलेल्या बेसुमार उत्खननामुळे पाण्याचे नैसर्गिक मार्ग बदलले आहेत. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी धरणाच्या दिशेने न येता इतरत्र वाहून जात आहे. या मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे धरणात पाण्याची आवक कमालीची घटली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास आणि पावसाची ओढ यामुळे यंदा पाणी टंचाईचे सावट गहिरे झाले असून प्रशासनाने योग्य नियोजन व उपाययोजना न केल्यास नागरिकांना भीषण समस्येला सामोरे जावे लागेल.





