श्रीवर्धन पर्यटन वाढीचे स्वप्न अधुरेच

। दिघी । वार्ताहर ।
रायगड व रत्नागिरी या दोन पर्यटन जिल्ह्यांना जोडणारा श्रीवर्धन तालुक्यातील महत्वाकांक्षी बागमांडला खाडीवरील पूल आज दहा वर्षे पुर्ण होत असताना अपूर्णच आहे. येथील कोकण वाशियांनी पर्यटन वाढीसाठी बघितलेले स्वप्न अधुरेच राहिले आहे. जिल्ह्यातील श्रीवर्धन कोकण किनारपट्टीच्या बागमांडला आणि रत्नागिरींतील वेश्‍वी दरम्यानच्या बाणकोट खाडीवर वरळी-सी लिंकप्रमाणे बांधण्यात येणार्‍या पुलाचे भूमीपूजन नोव्हेंबर 2012 मध्ये होऊन कामाला सुरुवात झाली. आजमितीला 2022 वर्ष संपत असून, दहा वर्षे उलटूनही या पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे पुलासाठी आणखी किती वर्षे थांबावे लागणार असा सवाल स्थानिक व पर्यटक करत आहेत.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून हा महत्त्वाकांक्षी सागरी सेतू उभारण्यात येणार आहे. या कामाची सुरुवात सुप्रीम इंफ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून करण्यात आली. मे 2016 मध्ये या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, कारण या सेतूमुळे रायगड व रत्नागिरी जिल्हे सागरी मार्गाने जोडले जातील, शिवाय या जिल्ह्यांंतील पर्यटन व्यवसाय आणि निर्यात वाढीला चालना मिळणार आहे. मात्र, गेली तीन ते चार वर्ष येथील काम बंद आहे.

बाणकोट खाडी पुलाचे काम सध्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग झाले असून या पुलाच्या कामासाठी नवीन निविदा प्रसिद्धी करण्यात आली आहे. त्यामुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणार्‍या या पुलासाठी अजून किती वाट पहावी लागणार हे अनुत्तरित आहे. पुढे रायगड-रत्नागिरी जिल्हे सागरी महामार्गाने जोडले जाणार व पुढे सिंधुदुर्गकडे जाणार्‍या पर्यटकांना मंडणगड, दापोलीमार्गे सर्वात जवळचा पर्यायी मार्ग असणार. त्यामुळे कमी प्रवास होऊन वेळ तसेच इंधनाची बचत होईल असं काही पर्यटन वाढीसाठी स्वप्न पाहणार्‍या कोकण वाशीयांच्या पदरात प्रतिक्षाच उरली आहे.

Exit mobile version