चित्रपटगृहात श्रीवर्धनचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव

सोमजाई देवस्थानने जपली परंपरा; धार्मिक उत्सवाला दिले प्रोत्साहन

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन येथील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव श्रीवर्धन सिनेमा थिएटरमध्ये सुरू करण्याचे मोठे कार्य थिएटरचे मालक स्व.विनायक मापुस्कर यांनी केले. आज त्यांच्या पश्चात सोमजाई देवस्थानने ती परंपरा सुरू ठेवली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील रहिवाशांना एक मनोरंजनाचे साधन उपलब्ध व्हावे या हेतूने श्रीवर्धन शहरातील वाणी आळी येथील उद्योजक विनायक मापुस्कर यांनी 1958 साली वाणी आळी परिसरात सिनेमा थिएटर सुरू केले. एकशेवीस आसन क्षमता असलेल्या थिएटर मध्ये ऐतिहासिक चित्रपटाबरोबर मनोरंजन करणारे मराठी व हिंदी चित्रपटाचा खेळ रात्री नऊ ते बारा या वेळेत दाखवण्यात यायचा.

श्रीवर्धन शहरात घरगुती गणपतीचे प्रमाण अधिक होते परंतु सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना तालुक्यात कुठेच केली जात नव्हती. श्रीवर्धनमध्ये सार्वजनिक गणपती हवा या हेतूने मापुस्कर व त्यांच्या मित्र मंडळींनी श्रीवर्धन शहरातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना 1960 सालात श्रीवर्धन सिनेमा थिएटरमध्ये केली. श्रीवर्धनमध्ये पहिलाच सार्वजनिक गणपती असल्यामुळे गणपती हा अनंत चतुर्दशी पर्यंत ठेवायचा असा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी सिनेमा थिएटर मध्ये फक्त रात्री नऊ ते बारा चा एकच खेळ दाखवला जायचा त्यामुळे पडद्याच्या एका बाजूला गणपतीची आरास केली जायची. पहिल्या सार्वजनिक गणपतीची ख्याती तालुक्यात पसरल्यावर खेडेगावातील मंडळी भजने, बैठक खेळ सादर करावयास येऊ लागले.अनेकदा सिनेमा थिएटरमध्ये होणारा एकमेव नऊ ते बाराचा खेळही रद्द करावा लागायचा.

सोमजाई देवस्थानने जोपासली परंपरा
कालांतराने सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना श्री सोमजाई देवस्थान ट्रस्ट सौजन्याने सोमजादेवी मंदिरात होऊ लागली. आजही श्रीवर्धन मधील पहिला सार्वजनिक गणपती हा अनंत चतुर्दशी पर्यंत ठेवला जातो. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज गणेशमूर्तीची पूजा सेवा सकाळ, संध्याकाळ आरती तसेच स्थानिकांची भजने, बैठक खेळ याबरोबर श्रीवर्धन तालुक्यातील विविध भजन मंडळे सोमजादेवी मंदिरात भजनांचे सादरीकरण करतात. तालुक्यातील भाविकांबरोबरच शहरातील भाविक मंदिरात प्रतिष्ठापना झालेल्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात.
Exit mobile version