श्रीवर्धनचा पारंपरिक नारळी पौर्णिमा उत्सव

श्रीवर्धन | आनंद जोशी |
श्रीवर्धन येथे गेली अनेक वर्षे नारळी पौर्णिमेचा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या प्रथेप्रमाणे श्रीवर्धन येथील वयोवृद्ध ज्येष्ठ समाजसेवक कै. विनायक महादेव तथा भाई मापुस्कर यांच्या घरी सजविलेल्या पाच नारळांचे पूजन श्रीवर्धनचे तहसीलदार यांच्या हस्ते केले जाते. यावेळी पोलीस अधिकारी व अन्य प्रतिष्ठित व्यक्तींनाही आमंत्रित केले जाते. पूजन झाल्यावर आरती होते. त्यानंतर श्रीफळांना वंदन केले जाते. तेथून श्रीफळांसह सवाद्य मिरवणूक निघून ती समुद्रावर जाते. तेथे पुन्हा तहसीलदार व अन्य मान्यवरांच्या हस्ते विधीवत श्रीफळांचे पूजन होते. त्यानंतर हे पाच नारळ सागराला अर्पण करण्यासाठी पूर्वापार सरकार, शेट्ये, कुलकर्णी, वर्तक व अधिकारी असे पाच मानकरी असतात. या मानकर्‍यांचे प्रतिनिधी यामध्ये भाग घेतात.
कोणाचे श्रीफळ समुद्राला आधी अर्पण होते, याकरिता वाद्यांच्या गजरात एक स्पर्धा आयोजित केली जात असे. परंतु, स्पर्धेत काही अपघात किंवा गैरप्रकार होऊ नयेत म्हणून गेली काही वर्षे ही धावण्याची स्पर्धा रद्द करण्यात आली असून, वरील प्रतिनिधी वाद्यांच्या गजरात समुद्राच्या पाण्यात जाऊन भक्तीभावाने सागराला श्रीफळ अर्पण करतात. ही परंपरागत पद्धती गेली कित्येक वर्षे सुरु असून, कै. विनायक मापुस्करांच्या आधी श्रीकृष्ण शेट्ये यांच्या घरी श्रीफळांचे पूजन होऊन पुढील सर्व कार्यक्रम पार पडत असत, असे सांगितले जाते. कै. विनायक मापुस्कर यांच्यानंतर ही परंपरा त्यांचे चिरंजीव व क्रीडापटू अजित मापुस्कर हे पूर्वापार पद्धतीने चालवीत आहेत.
दरम्यान, गेली काही वर्षे श्रीवर्धन सांस्कृतिक व पर्यटन विकास मंडळातर्फे नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्री सोमजाई देवीच्या पटांगणात श्रीवर्धनचे वैशिष्ट्य असलेली नारळ फोडण्याची स्पर्धा शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित केली जाते. ती पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

Exit mobile version