| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार शुभांगी कोंडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. सत्ताधारी महायुतीकडून या जागेसाठी उमेदवार न दिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
रेवदंडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 1 व 6 या आरक्षित जागांवर मनिषा चुनेकर या निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी वॉर्ड क्रमांक 1 चा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत शेकापच्यावतीने शुभांगी कोंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्ताधारी महायुतीकडून कोणताही उमेदवार न उभा राहिल्याने कोंडे या एकमेव उमेदवार ठरल्या आणि त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. या निवडीमुळे रेवदंडा परिसरात शेकाप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.







