सर्वाधिक मुहूर्त मेमध्ये, तर सर्वात कमी जूनमध्ये
| पनवेल | प्रतिनिधी |
तुळसी विवाह संपन्न झाल्यानंतर दरवर्षी ग्रामीण व शहरी भागात इच्छुकांच्या लग्नसराईची धामधूम सुरु होते. यंदा नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्तास सुरुवात झाली असून, विवाहाचे जवळपास 69 मुहूर्त असणार आहेत. यापैकी अनेक मुहूर्त हे डिसेंबर आणि मे या महिन्यात आहेत. वर्ष 2023 मध्ये मे महिन्यात विवाहाचे तब्बल 15 मुहूर्त होते. त्यावेळी विवाहाची जोरदार धामधूम पहावयास मिळाली होती. यात यंदा 69 मुहूर्त असल्याने यंदाही विवाहाची सर्वत्र जोरदार धामधूम पहावयास मिळणार एवढे मात्र निश्चित.
दिवाळी झाली की, तुळशी विवाहानंतर विवाह सोहळ्यास सुरुवात होत असते. नव्याने लग्नाच्या रेशीमगाठी जुळवण्यासाठी अनेकजण वधूवर सूचक मंडळात नोंदणी करत असतात. सर्वत्र लग्नाची लगबग सुरु असते. त्यानंतर लग्नाच्या वयात आलेल्या आपली मुलगी, मुलगा यांच्या विवाह सोहळ्यासाठी मुहूर्त पाहण्याचे काम आईवडिलांकडून जोरात सुरु होते. यंदाच्या वर्षी आणि जुळून आलेल्या रेशीमगाठी बांधण्यासाठी अर्थात लग्नासाठी तब्बल 69 तारखा ग्रह नक्षत्रानुसार शुभ असल्याचे सांगण्यात येते. यातील सर्वाधिक मुहूर्त हे डिसेंबर आणि मे महिन्यात आहेत. तर, सर्वात कमी मुहूर्त हे जून महिन्यात आहेत.
हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाह जुळविताना गुण आणि कुंडली पाहून विवाहाचा निर्णय घेण्याकडे आजही सर्वांचा कल असतो. तसेच मुहूर्त काढताना गुरु, शुक्र या ग्रहांचाही विचार केला जातो. लग्न सोहळा म्हटल्यावर वर आणि वधूसाठी आवश्यक खरेदीला वेग येण्यासह पूरक लहान-मोठ्या व्यवसायांना एक प्रकारे सुगीचे दिवस येतात. मंगल कार्यालये, कापड दुकाने, सोने-चांदीच्या पेढ्या गजबजून जातात. खरेदीची लगबग वाढून सगळीकडे उत्साहाचे वातावरण पसरते. मंगल कार्यालये आगाऊ नोंदणी करण्यासाठी अक्षरश: स्पर्धा दिसून येते. संपूर्ण लग्नसराईत एकही दिवस खाली जात नसल्याने नेमकी हीच संधी साधत, संबंधितांकडून मंगल कार्यालयांचे भाडेही वाढविले जाते. अनेकदा लहान मंगल कार्यालयेही मिळत नाही. अशीच काहीशी परिस्थिती लग्न सराईत निर्माण होत असते. त्यामुळे ही बाब लक्षात घेत, लग्न जुळलेल्या वधू-वराच्या कुटुंबाकडून आतापासूनच मंगल कार्यालये आरक्षित करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. तसेच बँड, हॉल, वाजंत्री, फोटो ग्राफर यांच्या बुकिंगसाठी आतापासूनच वेग वाढू लागला आहे. लग्न सोहळ्यानिमित्त वधूसह तिच्या मैत्रिणी व इतर नातेवाईक महिला यांच्यामध्ये आपल्या हातावर आकर्षक अशी मेहंदी काढण्याकडे विशेष कल असतो. त्यामुळे मेहंदी काढण्यासाठी लागणार्या कलाकारांनासुद्धा आतापासून मागणी येऊ लागली असल्याचे दिसून येते.
असे असणार मुहूर्त
डिसेंबर 3, 5, 6, 7, 11, 12, 14, 15, 20, 23, 24, 25.
नववर्षात जानेवारी 16, 17, 19, 21, 22, 26.
फेबु्रवारी 3, 4, 7, 13, 16, 17, 20, 21, 22, 23, 25.
मार्च 1, 2, 3, 6, 7, 12, 15.
एप्रिल 14, 18, 19, 20, 21, 22, 25, 30.
मे 1, 5, 6, 7, 8, 9, 10, 13, 14, 16, 17, 20, 23, 24.
जून 2, 4, 5, 6, 8.
