व्यावसायिकांना सुगीचे दिवस; मंगलकार्यालयांचे आरक्षण सुरू
। महाड । वार्ताहर ।
जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये विवाहाचे जवळपास 23 मुहूर्त असल्याने जिल्ह्यात लग्नसराईची लगबग सुरू असल्याचे दिसते. मेमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचा त्रास होत असल्याने थंडीच्या दोन महिन्यांमध्ये विवाह सोहळे करण्याकडे उपवर-वधूच्या कुटुंबीयांचा कल असतो. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही आलिशान लग्न सोहळे आयोजित केले जात असल्याने व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.
शाळा महाविद्यालयांना उन्हाळ्यात सुट्टी असल्याने पूर्वी मेमध्ये विवाहाचे मुहूर्त काढले जात होते, मात्र काही वर्षांपासून प्रचंड उकाडा वाढल्याने, तसेच पाणीटंचाई व इतर सोयीसुविधांवर अभाव जाणवत असल्याने अनेक घरांमध्ये आता मेऐवजी थंडीच्या हंगामात विवाह मुहूर्त धरण्याचे योजण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये अनेकांचे लग्नाचे बार उडणार असून, त्यापूर्वी प्री-वेडिंग शूटही केले जात आहे. फेब्रुवारीपर्यंत तब्बल 23 विवाह मुहूर्त असल्याने इच्छुक वधू-वरांसह त्यांच्या कुटुंबियांकडून खरेदी, हॉल बुकिंग, केटरर्स, सजावट, फोटोग्राफी-व्हिडिओग्राफीच्या बहुतांश ऑर्डर देण्यात आल्या आहेत. विवाह सोहळ्यासाठी प्रामुख्याने सभागृहांची आवश्यकता असल्याने रायगड जिल्ह्यातील विवाह सोहळ्यांसाठी दिली जाणारी सभागृहे आरक्षित झाली आहेत. विवाह सोहळ्याशी संबंधित असणारे केटरर्स, वाजंत्री, मंडप डेकोरेटर, ब्युटी पार्लर, मेहंदी व्यावसायिक, सभागृह, फेटे बांधणारे, विद्युत रोषणाई करणारे यांसह पुरोहितांना सुगीचे दिवस आले आहेत.
विवाह सोहळ्यासाठी खासकरून बँक्वेट हॉल, वेगवेगळी सभागृहे, हिरवळीचे प्रशस्त मैदाने, उद्याने तसेच समुद्रकिनारी अथवा निसर्गरम्य ठिकाणी असणार्या रिसॉर्टला वर्हाडी मंडळी खास पसंती देत आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा, श्रीवर्धन, अलिबाग, कर्जत, माथेरान, पनवेल हरिहरेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या ठिकाणचे अनेक रिसॉर्ट महिनाभर दररोज विवाह सोहळ्यासाठी आरक्षित झाले आहेत.
विवाह सोहळ्यामध्ये आकर्षक सजावटी करण्याकडे कल वाढू लागला आहे. अनेक लहान-मोठे इव्हेंट्स मॅनेज करणारे तरुण आता अशा प्रकारची कामे घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या हाताला रोजगार मिळत आहे. मंडप डेकोरेटर्सना मागणी वाढली आहे. लग्न सोहळ्यात मंडपाची सजावट, स्टेजची सजावट, छत व सभोवताली कापडी सजावट, देव-देवदेवतांच्या मूर्ती, तसेच फुगे सजावट ही सर्व कामे करणार्यांना मोठ्या ऑर्डर्स मिळू लागल्या आहेत. जेवणातील मेनूला विशेष महत्त्व असल्याने केटरर्सचा व्यवसाय वाढला आहे. काही ठिकाणी जिल्ह्याच्या बाहेरील केटरर्सना निमंत्रित केले जात आहे. प्रत्येक केटरर्सची काही खासियत असल्याने मागणी वाढत आहे. श्रीखंड, रबडी व रसमलईचे विविध प्रकार बनविणार्या स्पेशल केटरर्सना मागणी असल्याचे केटरर्स दीपक कात्रे यांनी सांगितले.
विवाह मुहूर्त
जानेवारी - 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 26 आणि 27 जानेवारी
फेब्रुवारी - 2, 3, 6, 7, 12, 13, 14, 15, 18, 19, 21, 23 आणि 25.