रस्ता सुरक्षा सप्ताहातून करणार समुपदेशन
। रायगड । प्रतिनिधी ।
रायगडमधील महामार्गांबरोबरच अंतर्गत मार्गांच्या दुरवस्थेमुळे रस्ते अपघातांचीही संख्या वाढली आहे. वर्षभरात रायगडमध्ये 732 रस्ते अपघातांची नोंद असून यात 266 जणांचा मृत्यू झाला, तर 624 जण गंभीर जखमी झालेत. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे.सध्या 11 ते 17 जानेवारीदरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. चालकांनी कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी, याची माहिती वाहतूक पोलिसांच्या वतीने दिली जात आहे. अशाच प्रकारे दरवर्षी जनजागृतीच्या मोहिमा जिल्ह्यात राबवल्या जात असल्या तरी अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही.
कोकणातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होणारी अवजड वाहतूक, वाहनचालकांची बेपर्वाई आणि वाहतूक नियमांकडे केलेले दुर्लक्ष ही अपघातामागील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज आहे. जिल्ह्यातून सात प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात. यात मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-पुणे महामार्ग क्रमांक चार या वडखळ-अलिबाग महामार्ग, दिघी- माणगाव-ताम्हाणी घाट महामार्ग, खोपोली-वाकण-आगरदांडा महामार्ग आणि पेण-खोपोली महामार्ग या राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. सातही महामार्गांचा विचार केल्यास, मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण उर्वरित महामार्गांच्या तुलनेत जास्त आहे. वर्षभरात जिल्ह्यातील गुन्हेगारीचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नुकताच प्रसिद्ध केला, यात किती अपघात झाले, याची माहिती सविस्तर दिली आहे.
वर्षभरात मुंबई-गोवा महामार्गावर 154 अपघात झाले, यात 61 जणांचा मृत्यू झाला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 118 अपघात झाले. यात 41 जणांचा मृत्यू झाला. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर 76 अपघातांची नोंद झाली, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या आकडेवारीचा विचार केला तर जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के अपघात या तीन महामार्गांवरच होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे रस्ते अपघात रोखण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, तीव्र उतार, चुकीच्या आणि वाहनचालकांचा बेदरकारी ही अपघातामागची प्रमुख कारणे आहेत, तर द्रुतगती मार्गावर लेनची शिस्त न पाळणे, वेग मर्यादा न पाळणे, गाड्यांचे टायर फुटणे ही अपघातांमागची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय दारू पिऊन गाडी चालवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकींग करणे यामुळेही अपघात होत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकचालकांकडून घाट उतारावर वाहने न्यूट्रल गिअरवर चालवली जातात. ज्यामुळे वाहनांवरील ताबा सुटतो आणि अपघात होतात. मुंबई-गोवा महामार्गावर संथगतीने सुरू असणारे रुंदीकरणाची कामेही अपघातास कारणीभूत ठरत आहे.
चालकांमध्ये प्रबोधनाची गरज
मुंबई-गोवा महामार्गाचे सध्या चौपदरीकरण सुरू आहे. यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी पर्यायी मार्ग टाकण्यात आले आहेत; मात्र पर्यायी मार्गाचे सूचनाफलक नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांचा गोंधळ उडतो आणि अपघात होतात. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहनचालकांना सूचना देणारे फलक बसवण्याची मागणी केली जात आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळा ते खालापूरदरम्यान तीव्र उतारावर अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करणे, वाहनचालकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी
वर्ष/अपघात/मृत्यू/जखमी
2019/991/216/ 613
2020/596 /206/ 409
2021/688/236/379
2022/724/276/689
2023/700/281/593
2024/732/266/624.
रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष केल्याने अनेक अपघात घडत असतात. देशात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करायला हवे, वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवायला हवे. चालकांचे प्रबोधन करण्याचे प्रयत्न सातत्याने करीत आहोत. त्यात काही प्रमाणात यशही येत आहे.
सोमनाथ लाडे,
वाहतूक पोलिस निरीक्षक, रायगड.