| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजाला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट घेणार्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, डेवॉन कॉनवे, शुभमन गिल असे अनेक खेळाडू आहेत. दरम्यान, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल विराट कोहलीच्या पुढे गेले आहेत. यशस्वी जैस्वाल सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसर्या स्थानावर, तर शुभमन गिल तिसर्या स्थानावर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने आतापर्यंतच्या हंगामात सर्वाधिक धावा केल्याने त्याच्याकडे सध्या ऑरेंज कॅप आहे. डु प्लेसिसने दहा सामन्यांमध्ये 511 धावा केल्या आहेत. दुसर्या क्रमांकावर राजस्थानचा फलंदाज यशस्वी जैस्वाल असून, त्याने 11 सामन्यांत 477 धावांचा पल्ला गाठला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गुजरातचा शुभमन गिल तिसर्या क्रमांकावर पोहोचला आहे.