सिद्धगड बलिदान दिन अभिवादन सभा

नेरळमध्ये हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण; व्यक्ती, संस्थेचा पूरस्काराने सन्मान

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी स्थापन केलेल्या हुतात्मा स्मारक समिती या समाजसेवी संघटनेच्यावतीने हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा बलिदान दिन दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी सिद्धगड बलिदान दिनी वांगणी-बदलापूर येथे पाणवठा संस्था तसेच मुरबाड येथील लेखक गिरीश कंटे यांना हुतात्मा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईतील हुतात्मा चौक येथे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या शिल्पाची हुबेहूब प्रतिकृती नेरळ येथील हुतात्मा चौकात उभारण्यात आली आहे. त्या स्मारकाचे लोकार्पण देखील बलिदान दिनी होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी 2005 साली नेरळ येथे हुतात्मा स्मारक समितीची स्थापना केली होती. तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्यासह 1942 मध्ये ब्रिटिश सरकारला देशातून चले जावं करण्यासाठी पुकारलेल्या लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिक सहभागी झाले होते. त्या सर्वांच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य ही समिती करीत आली आहे. या समितीच्यावतीने दरवर्षी 2 जानेवारी रोजी हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा बलिदान दिनानिमित्त सिद्धगड बलिदान दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमात समाजातील देशहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान केला जातो. यंदा वांगणी-बदलापूरमध्ये मुक्या प्राण्यांवर उपचार करून त्यांच्यासाठी गेली 20 वर्षे अनाथाश्रम चालवणारी पाणवठा संस्था आणि त्यांचे प्रमुख गजराज जैन यांना हुतात्मा गौरव पूरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच, आझाद दस्त्यातील क्रांतिकारक आणि हुतात्मांचा इतिहास पुस्तक रूपाने सर्वांसमोर आणणारे मुरबाड तालुक्यातील लेखक गिरीश कंटे यांना देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.

तसेच, हुतात्मा स्मारक समितीने घेतलेल्या पाठपुराव्यानंतर रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी प्राप्त झाला होता. त्या निधीमधून हुतात्मा चौक येथे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे प्रतीक समजले जाणारे हुतात्मा शिल्प उभारले आहे. या स्मारकाचे लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांचे हस्ते केले जाणार आहे. या सिद्धगड बलिदान दिन अभिवादन सभेला माजी आमदार सुरेश लाड, सुरेश टोकरे, सुधाकर घारे यांच्यासह तालुक्याचे तहसीलदार डॉ. धनंजय जाधव, तालुका पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड, कर्जतच्या नगराध्यक्षा पुष्पा दगडे, माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक सुजित धनगर आणि नेरळचे प्रभारी पोलीस अधिकारी राहुल वरोटे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी नेरळ परिसरातील शाळांचे विद्यार्थी समूह गीते आणि समरगीते सादर करणार आहेत.तरी सर्व देशप्रेमी नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन हुतात्मा स्मारक समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version