| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील राजिप शाळा सिद्धेश्वर येथे 6 ऑगस्ट रोजी 149 वा वर्धापन दिन सोहळा माजी विद्यार्थिनी लीलावती सितापराव यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यादरम्यान प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवी प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. एसएससी आणि एचएससी, पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन शाळा वर्धापन दिन समितीच्यावतीने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सुधागड तालुका गटशिक्षणाधिकारी सादूराम बांगारे, माजी विद्यार्थिनी लीलावती सितापराव, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सिद्धेश्वर आशिका पवार, उपसरपंच शरद किंजावडे, ग्रामपंचायत सदस्या समृद्धी यादव, केंद्रप्रमुख कैलास म्हात्रे, परमानंद राईलकर, पोलीस पाटील सुनील पोंगडे, पत्रकार मंगेश यादव, ग्रामसेवक प्रवीण पाटील, ग्रामस्थ, महिला भगिनी, माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते. या सर्व उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प, आंबा कलम, कडुलिंब रोप देऊन स्वागत करण्यात आले.
149 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करणारी शाळा सिद्धेश्वर ही रायगडातील एकमेव शाळा आहे, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. तसेच या शाळेतून असंख्य विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदावर आज नोकरी करत आहेत. एवढी वर्ष होऊनदेखील प्रशासकीय कागदपत्रे व नोंदी उत्तमरित्या अद्ययावत आहेत.
– साधुराम बांगारे, गटशिक्षणाधिकारी, सुधागड