हरित भविष्याकडे महत्त्वपूर्ण पावले
| उरण | प्रतिनिधी |
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असून आपल्या कार्यक्षेत्रात सभोवतालच्या वायुगुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा नोंदवत आहे. अलीकडील वायुगुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) डेटाच्या तुलनेत सकारात्मक कल दिसून येत असून एक्यूआयमध्ये ठोस सुधारणा झाली आहे. ही सातत्यपूर्ण घट जेएनपीएद्वारे राबविण्यात आलेल्या पद्धतशीर पर्यावरणीय हस्तक्षेप, हरित उपक्रम आणि सक्रिय निरीक्षण यंत्रणांची प्रभावी अंमलबजावणी दर्शवत आहे. शाश्वत विकासाच्या दिशेने जेएनपीएची बांधिलकी अधिक बळकट होत असून पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि स्वच्छ तंत्रज्ञानावर भर देत बंदराने हरित भविष्याकडे महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मागील वर्षाच्या तुलनेत पीएम 10 पातळीत सातत्यपूर्ण सुधारणा नोंदविण्यात आली. विशेषतः नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत अनुक्रमे सुमारे 33 टक्के आणि 29 टक्के इतकी लक्षणीय घट झाली असून, हिवाळ्याच्या उच्च कालावधीत धूळजन्य प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे हे स्पष्टपणे दर्शवत आहे. पीएम 2.5 पातळीत मिश्र स्वरूपाचा कल दिसून आला. नोव्हेंबर महिन्यात पीएम 2.5 मध्ये सुमारे 25 टक्के घट नोंदविण्यात आली असून, ही स्पष्ट सुधारणा दर्शवत आहे. एकूणच आकडेवारीनुसार, हंगामादरम्यान मोठ्या आकाराच्या कणांमुळे होणारे प्रदूषण लक्षणीय प्रमाणात कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. ऑक्टोबर 2025 पासून बंदरातील प्रमुख कार्यक्षेत्रांमध्ये यांत्रिक रस्ते-धूळ स्वच्छता वाहने तसेच धूळ दमन यंत्रांची तैनाती केल्यानंतर वायुगुणवत्तेत ही सुधारणा दिसून येत आहे. हे उपाय जेएनपीए यांच्या सर्वसमावेशक पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीचा तसेच व्यापक ग्रीन पोर्ट धोरणाचा अविभाज्य भाग आहेत.
शाश्वत मोबिलिटीकडे वाटचाल
जेएनपीए स्वच्छ व शाश्वत मोबिलिटीकडे वाटचाल करत आपल्या कार्यप्रणालीत विद्युत व पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा समावेश करीत आहे. सध्या 10 विद्युत कार आणि 52 सीएनजी कार वापरात असून, कंटेनर यार्डमध्ये बॅटरी स्वॅपिंग स्टेशनच्या सहाय्याने 53 विद्युत ट्रक्स कार्यरत आहेत. विद्युत वाहन परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी दोन बॅटरी स्वॅपिंग स्टेशन आणि सहा चार्जिंग पॉइंट्स आधीच कार्यान्वित करण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात, डिसेंबरपर्यंत 150 हून अधिक विद्युत ट्रक्स तैनात करण्याचे नियोजन असून, अधिकृत कार व बसचे विद्युत वाहनांमध्ये रूपांतराची प्रक्रिया सुरू आहे.
इंधन व उत्सर्जन बचत
आतापर्यंत सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा (सीपीपी) मुळे बंदर परिसंस्थेत ट्रक वाहतुकीचे सुयोग्य नियोजन व वाहनांच्या निष्क्रिय (आयडलिंग) वेळेत घट झाल्याने ठोस पर्यावरणीय तसेच आर्थिक लाभ साध्य झाले आहेत. या उपक्रमामुळे 12.9 कोटींहून अधिक डिझेल बचत झाली असून, सुमारे 3.65 दशलक्ष किलोग्रॅम कार्बन उत्सर्जनात घट नोंदविण्यात आली आहे. हा उपक्रम प्रभावी वाहतूक नियोजन आणि कार्यक्षमता वाढविणाऱ्या उपाययोजनांमुळे इंधन वापर कमी करणे, उत्सर्जनात घट घडवणे आणि शाश्वत बंदर संचालनाला चालना देणे कसे शक्य होते, याचे उत्तम उदाहरण ठरतो. जेएनपीए अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे हरित व जबाबदार बंदर विकासाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहे.







