रायगडात हेल्मेटसक्तीचे संकेत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यात शासकीय कार्यालयात येणार्‍या सर्व नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचारी यांना दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे अनिर्वाय करण्यात येणार असून, शासकीय कार्यालयात येताना विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आलेल्या नागरिक/कर्मचारी/अधिकारी यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत मोटार वाहन विभाग तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत विशेष तपासणी मोहिमेंतर्गत व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचारी/अधिकारी हे विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालवित असतात. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे, हे रस्ता सुरक्षेच्या तसेच स्वत:च्या जीवाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे बहुतांशी वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात.

हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणीसंबंधी व्यापक मोहीम प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण रायगड व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्था यांना सहभागी करून शासकीय कार्यालयात येताना विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आलेल्या नागरिक/कर्मचारी/अधिकारी यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत मोटार वाहन विभाग तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत विशेष तपासणी मोहिमेंतर्गत व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व विभागांतील प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच इतर सर्व नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण-रायगड व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version