माणगावात मुस्लिम बांधवांचा मूकमोर्चा

। माणगाव । प्रतिनिधी ।
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद रायगडात ठिकठिकाणी उमटू लागले आहेत. माणगाव तालुक्यातील 22 गावांतील मुस्लिम समाज बांधवानी याबाबत मंगळवारी सकाळी एकत्रित येत मोर्चा काढून याबाबतचा निषेध करून माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे यांना तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने ज्येष्ठ नेते इकबाल धनसे, नजीर धनसे, अलीशेठ कौचाली, अस्लम राऊत, सिराज परदेशी, महामूद धुंद्वारे, गोरेगाव सरपंच जुबेर अब्बासी यांनी हजारो मुस्लिम बांधवांच्या साक्षीने निवेदन दिले. मुस्लिम बांधवानी काढलेल्या या भव्य निषेध मूकमोर्चाला उपस्थित राहून बहुजन क्रांती व भारतमुक्ती मोर्चा माणगाव तालुका संघटक राकेश मोरे यांनी बहुजन क्रांती भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने पाठिंबा दिला.


माणगाव तालुक्यातील 22 गावांतील मुस्लिम समाज बांधवानी मंगळवारी एकत्रित येत या वक्तव्याचा व हे वक्तव्य करणार्‍यांचा जाहीर निषेध करीत मूकमोर्चा काढला. सकाळी 11 वाजता स्टेट बँक ऑफ शाखा माणगाव येथून शिस्तबद्ध पद्धतीने मौलानांनी केलेल्या सूचनेप्रमाणे हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले मुस्लिम बांधवानी एकत्रित येत हातात आका कि शान मे गुस्ताखी बरदास्त नही करेंगे, नुपूर वर्मा और नवीन जिंदाल को गिरफ्तार करो अशा नावांचे पोष्टर्स घेऊन कचेरी रोड मार्गे माणगाव तहसील कार्यालय असा भव्य मूक मोर्चा काढला.

Exit mobile version